मालेगाव : रमजान महिन्यात शहरात विशेष पदार्थ बनविले जातात. रमजानमध्ये (Ramzan Eid) तयार होणाऱ्या नान, सुतरफेणी पाठोपाठ हलवा पराठा व माल पोहाची लज्जत येथे चाखली जात आहे. या पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. येथे उत्तर प्रदेशमधील हलवा पराठा व माल पोहा बनविणारे कारागिर दाखल झाले आहेत. रमजान पर्वात भरणाऱ्या विशेष बाजाराबरोबरच प्रमुख चौकांमध्ये हलवा पराठा व माल पोहाची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत.
रमजान पर्वात येथे नान (मोठा पाव) व सुत्तरफेणीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुस्लिमांबरोबरच हिंदू (Hindu Muslim) बांधवही नान व सुत्तरफेणीच्या प्रेमात पडले आहेत. शहरात गेल्या सात दशकापासून नान व सुतरफेणीने तयार केले जातात. त्यापाठोपाठ येथे ३५ वर्षांपासून हलवा पराठा व माल पोहाची चव चाखली जात आहे. रमजान महिन्यात तयार होणाऱ्या हलवा पराठा व माल पोहाने येथील खवय्यांना भुरळ घातली आहे. हलवा पराठा व माल पोहा प्रामुख्याने मैदा, रवा, तूप, तेल आदींपासून तयार केला जातो. सर्व वस्तूंचे भाव वाढल्याने माल पोहा महाग झाला आहे. तरीही नागरिकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळत आहे.
शहरात १० ते १५ ठिकाणी हलवा पराठा व माल पोहा तयार होतो. येथील सुलेमानी चौक, रहेमान मशीद जवळ, मोहम्मद अली रोड, अंजुमन चौक, सलाम चाचा रोड, जाफर नगर, आझाद नगर यासह अनेक चौकात दुकाने लागली आहेत. हलवा पराठा व माल पोहाची दोनशे रुपये किलोने विक्री होत आहे. रमजान पर्वात रात्री उशिरापर्यंत दुकाने, प्रतिष्ठाने सुरु असतात. खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्येही रात्री उशिरापर्यंत गजबज असते. हलवा पराठा व माल पोहा या चविष्ट पदार्थांना कॅम्प संगमेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील हिंदू बांधवांकडूनही खरेदीसाठी प्रतिसाद मिळत असल्याचे हबीबुर रहमान यांनी सांगितले.
अशी आहे प्रक्रिया
हलवा पराठा तयार करण्यासाठी मैद्यात अंडी टाकली जातात. अंडी मिश्रण केल्यानंतरच पराठा तयार होतो. एक किलो मैद्यात दहा नग तयार होतात. पराठ्याला मोठ्या तव्यावर तुपात तळतात. एका दुकानात रात्रीतून १०० नग विक्रीला जातात. हलव्यासाठी रवा, तुप, साखर यांचे मिश्रण करुन तयार करतात. माल पोहा बेसन पीठ, अंडी, साखर यापासून तयार केला जातो. माल पोहा पन्नास रुपये नगापासून ते शंभर रुपयांपर्यंत विक्री होत आहे. येथे एका दुकानात दोन ते तीन कारागिर काम करत असल्याचे अन्सारी फहीम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.