सिन्नर (जि. नाशिक) : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या कारखान्यांचे पार्किंग शेड, हॉटेल, टपऱ्या अशा ५० अतिक्रमण धारकांवर औद्योगिक विकास महामंडळाने कारवाई करत ही अतिक्रमणे हटविली. यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. मात्र सदरची कारवाई करताना या व्यावसायिक यांना कुठल्याही प्रकारची सूचना किंवा नोटीस न देता अतिक्रमणे हटविल्याने टपरी चालकांसह व्यावसायिकांनी या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. (Hammer on encroachments in Sinnar MIDC Nashik News)
माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून ठिकठिकाणी शेड, हॉटेलचालक, टपरीधारक यांनी अतिक्रमण करत व्यवसाय थाटले होते. त्यामुळे या भागातून जातांना वाहनचालक यांना या अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागत होते. तसेच याठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील होऊ लागली होती.
आधीपासूनच या रस्त्याची दुरवस्था असल्याने याठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले होते. काही दिवसांपूर्वीच येथील मुख्य रस्त्यावर खडीकरण करण्यात आले. परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अतिक्रमणामुळे सदरचा रस्ता अरुंद पडत होता. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढून घेण्याबाबत औद्यागिक विकास महामंडळाकडे वारंवार मागणी केली जात होती.
अखेर औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता श्री. उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी (ता.२३) अकराला जेसीबी लावून ही अतिक्रमणे काढण्यास सुरवात झाली. प्रथम जिंदाल कारखान्याजवळील मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी रस्त्यांच्या कडेला असलेल्या ५० हून अधिक कारखान्यांनी कंपाउंड लगत पार्किंग शेड उभारले होते.
तर बहुतांश हॉटेलमालकांनी रस्त्यापर्यंत शेड वाढवले होते. जेसीबीच्या साहाय्याने हे सर्व अतिक्रमण पाडण्यात आले. वसाहतीत अनेक ठिकाणी अनधिकृत चहाची दुकाने, टपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. त्या देखील काढण्यात आल्या. कारखान्यांनी लावलेले फलकही रस्त्याच्या हद्दीतून काढण्यात आले. त्यामुळे भरगच्च वाटणाऱ्या मुख्य रस्त्याने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला.
महिलांनी फोडला टाहो
औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिक्रमणधारक अचानक झालेल्या कारवाईमुळे हॉटेल व टपरी चालकांचा चांगलाच गोंधळ उडाला. कुठलीही नोटीस न दिल्याने कारवाईबाबत अनभिज्ञ असलेल्या या व्यावसायिकांनी अतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी वेळ देण्याची मागणी उपअभियंता उबाळे यांच्याकडे केली.
आम्ही स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतो असे सांगूनही त्यांना नकार मिळाल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे अनधिकृत टपरीधारकांना सावरण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे काही टपरी चालक महिलांनी यावेळी टाहो फोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.