Nashik Agriculture News : मका सोंगणी करून देतो, पण चारा आम्हाला द्या! मका वाळल्याने काढणीला महाग

Nashik Agriculture News : मका सोंगणी करून देतो, पण चारा आम्हाला द्या! मका वाळल्याने काढणीला महाग
Updated on

Nashik Agriculture News : सुरवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने तालुक्यात तब्बल ३८ हजार हेक्टरवर घेतलेल्या मका पिकाची पूर्णतः वाताहत झाली आहे. किंबहुना ८० टक्क्यांवर मका पिकाचे नुकसान झाले आहे.

बिट्या लागण्यापूर्वीच मका शेतातच करपल्याने फक्त चारा म्हणून त्याचा वापर होणार आहे. त्यातही येणाऱ्या दिवसांत चाऱ्याचा गंभीर प्रश्न असल्याने अनेक पशुपालक ‘तुमच्या शेतातील मका सोंगणी करून देतो, पण चारा मला द्या’, अशी अट घालून चारा उपलब्ध करीत आहेत.

तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर घेतलेल्या मका पिकाला लागवडीपासूनच पावसाचा फटका बसला. सुरवातीला रिमझिम पावसावर मक्याचे पीक वाढले, पण वाढ व बिट्या लागण्याच्या काळातच पाऊस गायब झाल्याने टंचाईचा मोठा हिसका बसला. (Harvesting is expensive due to drying up of maize in Yeola nashik news)

यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे व मशागतीसाठी गुंतवलेले भांडवलही मातीत गेले. शेतात फक्त सांगाडा उभा असल्याने आता सोंगणी परवडणारी नसल्याने शेतकरी ‘चारा घेऊन जा, मका सोंगणी करून द्या’, या गणिताने मक्याची सोंगणी करीत आहेत.

कांदा व कपाशीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मका हाच उत्तम पर्याय मिळाला आहे. ३५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असताना, कमी पावसातही तब्बल ४१ हजार ३६८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी यंदा मका लावला. मात्र या वर्षी क्षेत्र वाढले, पण पावसाळा संपला तरी जमिनीची तहान भागेल, असा पाऊस झाला नाही. त्यामुळे मक्याल दुष्काळाचा फटका बसला.

त्याचे विपरीत परिणाम पुढे येऊ लागले आहेत. त्याची वाढ निम्म्याने खुंटली आहे. शिवाय बिट्याच न लागल्याने व अल्प प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादनात विक्रमी घट झाली आहे. शिवाय पाणी उपलब्ध असलेल्या २०-२५ टक्के क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मका पिकविला. तेथेही विक्रमी उत्पादन घटले आहे.

यंदा एकरी सरासरी फक्त तीन ते सात क्विंटल उत्पादन निघत आहे. या गणिताने एकरात दर वर्षी जेथे ३० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. तेथे या वर्षी पाच ते दहा हजारांपर्यंतच उत्पन्न मिळत आहे. ८० टक्के क्षेत्रात उत्पादन दूरच, पण आता सोंगणीलाही पैसे लावणे अशक्य आहे.

यामुळे सोंगणी करणेही आर्थिक भुर्दंड ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली असून, ‘चारा घेऊन जा, पण सोंगणी करून द्या’, या हिशेबाने मका काढणी सुरू केली आहे.

Nashik Agriculture News : मका सोंगणी करून देतो, पण चारा आम्हाला द्या! मका वाळल्याने काढणीला महाग
Nashik Agriculture News: बारागांवपिंप्री येथे भुईमूगात घेतले सूर्यफुलाचे आंतरपीक!

विशेष म्हणजे चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकरी स्वतःहून सोंगणीसाठी पुढे येऊन चारा नेत आहेत.

चिंता पुढच्या दहा महिन्यांची..!

बाजरीचा चारा, सोयाबीनचा भुसा, कडधान्याचा कडबा, भुईमुगाचा पाचोळा, गव्हाचा भुसा हे सर्व जनावरांचे खाद्य असते. हिरवा चाराही असतो. तो वेगळाच. या वर्षी पिकांचा वाळलेला चारा मिळणे दुरापास्त असून, शेतकऱ्यांना आगामी दिवसांची चिंता पडली आहे. गावोगावी अनेक दुग्धव्यावसायिक असून, त्यांनाही येणाऱ्या दहा महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे.

दुग्धव्यावसायिक कुटुंबातील सदस्यांना घेऊन मका काढणी करून देत त्याबदल्यात चारा घेऊन साठवण करून ठेवत आहे. मक्याचा चारा हा पौष्टिक असल्याने तो जनावरेही खातात. गरजेपोटी पशुपालकांत चारा मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी घरच्या घरी चारा सोंगणी करून त्याची विक्री करीत आहेत.

शेतातील पिकांची पाण्याअभावी वाताहत झाली असून, पुढील पावसाळ्यापर्यंत चारा कसा पुरवावा, हा प्रश्न आहे. स्वत:च्या गायी व इतर जनावरे असल्याने सोंगणीच्या बदल्यात चारा उपलब्ध करून ठेवत आहोत. विकतही चारा मिळत नसल्याने हा पर्याय स्वीकारावा लागत आहे. -राजेंद्र अलगट, शेतकरी, राजापूर

मक्याचे आकडे बोलतात

-क्षेत्र : ४१ हजार ३६८ हेक्टर

-उत्पादक शेतकरी- सुमारे १७ हजार

-एकरी उत्पादन : ० ते २० क्विंटल

-सोंगणीची मजुरी : ४००० प्रतिएकर

- चारा : दर वर्षी चार, यंदा एक-दीड ट्रॉलीपर्यंत

Nashik Agriculture News : मका सोंगणी करून देतो, पण चारा आम्हाला द्या! मका वाळल्याने काढणीला महाग
Nashik Agriculture News : ‘व्हाइट गोल्ड’ची क्षेत्रवाढ; उत्पादन मात्र घटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.