पांढुर्ली (जि. नाशिक) : ‘अमर रहे, अमर रहे, खंडू बरकले अमर रहे’, ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम्’ या जयघोषात आगासखिंड येथे वीर जवान खंडू बरकले यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (heartfelt farewell to brave soldier Khandu Barkley Nashik News)
वीर जवान बरकले यांचे पार्थिव गावात आणताच उपस्थित लष्कराचे जवान, जिल्हाभरातील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना गेल्या २२ फेब्रुवारीला खंडू बरकले गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर तेथेच एक शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना २४ फेब्रुवारीला चंदिगड येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे भाऊ रावसाहेब बरकले, पत्नी योगिता, मुलगा हृषीकेश, मुलगी रितू, निवृत्त कॅप्टन रामनाथ गवारे त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
उपचार सुरू असतानाच गेल्या ७ मार्चला त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ही बातमी समजल्यापासून संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. शवविच्छेदन व अन्य प्रक्रियेनंतर सोमवारी (ता. १३) सकाळी त्यांचे पार्थिव चंदिगडहून लष्कराच्या विशेष विमानने मुंबईत आणि तेथून विशेष रुग्णवाहिकेने सकाळी साडेबाराला त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले.
या वेळी बेलू फाट्यापासूनच नागरिकांनी दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. रुग्णवाहिकेतून आर्टिलरी सेंटरच्या विशेष वाहनात व सजवलेल्या रथामध्ये जवानांनी सन्मानपूर्वक पार्थिव ठेवून भव्य मिरवणूक काढली. या वेळी ‘अमर रहे, अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
गावातील ‘एनसीसी’चे विद्यार्थी, तसेच भजनी ग्रुप आणि तरुणांनी मानवी साखळी केली होती. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सर्वच उपस्थित मानवंदना देण्यासाठी भरउन्हात चालत होते. मिरवणूक गावात येताच बरकले यांच्या निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
वीर जवान खंडू यांचे भाऊ दामू बरकले, नंदू बरकले, रावसाहेब बरकले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवारदेखील शोकसागरात बुडाला होता. त्यानंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी घराघरांतून सर्वांनी मानवंदना देतानाच अखेरचे दर्शन घेतले व पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.
गावातील शरदचंद्रजी पवार ग्रामसंकुलाच्या पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरवातीला लष्कराच्या जवानांनी शासकीय इतमामात बिगुल वाजवून सलामी दिली. आर्टिलरी सेंटरतर्फे लेफ्टनंट कर्नल सतीश मिश्रा, सुभेदार पाठक, तसेच राज्य शासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री. मुंदडा, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक संघटनेतर्फे विजय कातोरे, सरपंच मीना आरोटे, सोसायटीचे अध्यक्ष भरत आरोटे, वीरपत्नी योगिता बरकले, भाऊ दामू बरकले, नंदू बरकले, रावसाहेब बरकले, प्रदीप शिंदे, लक्ष्मणराव महाडिक, दत्तात्रय आरोटे आणि वीर जवानाचे सहकारी 356A./DSC युनिटतर्फे सुभेदार थापा यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
पुत्र हृषीकेश याने चितेस अग्निडाग दिला. दरम्यान, या ठिकाणी भव्य स्मारक बांधण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला. जिल्हाभरातील आजी-माजी सैनिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, कृषी व लष्करी क्षेत्रांसह गावातील व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. प्रदीप शिंदे, श्री. महाडिक आणि दत्तात्रय आरोटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.