Nashik Rain News : तब्बल दीड ते दोन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस अद्यापही नांदगाव तालुक्यावर रुसलेला आहे.
सगळीकडे दाटून आलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची आस वाढीला लागते अन पाऊसही पडतोय मात्र तोही रिमझिम. यामुळे नांदगाव तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा लागूनच आहे.
तालुक्यात आतापावेतो अवघे छत्तीस टक्के एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या निम्मा देखील पाऊस न झाल्याने सगळी पिके करपून काळवंडून गेल्याने खरीप हातचा गेला आहे. (Heavy rain is expected in Nandgaon taluka nashik news)
आता शेतात जो काही दिसतोय त्याची उत्पन्नाची टक्केवारी देखील वीस ते पंचवीस टक्क्याच्या आत राहणार असल्याचा अंदाज शासकीय यंत्रणेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे किमान तालुक्यातील कोरड्याठाक झालेल्या जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ होईल अशी आशाही धूसर होवू लागली आहे. तालुक्यात पाऊसच नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार कशी या समस्येने यंत्रणेसह सर्वांपुढे यक्ष प्रश्न उभा केला आहे.
नांदगावला धरणांचा तालुका म्हणून ओळखले जाते. गिरणा, मन्याड ही मोठाी धरणे तालुक्यात असली तरी त्याचा लाभ जळगावसह खान्देशाला होतो. उर्वरित प्रकल्पातले मध्यम व अन्य लघू पाटबंधारे व शेकडोच्या संख्येतील मृदा संधारणातील बंधारे, लघू प्रकल्पातील आठही साठवण तलाव अशी तालुक्यातील मर्यादित जलसंपदा असली तरी गिरणा धरणाच्या जलाशयात देखील अद्यापही म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यातच माणिकपुंज, मन्याड, नाग्यासाक्या धरणाच्या जलाशयात केवळ आता मृतसाठाच शिल्लक आहे.
शाखांबरी, लेंडी, पांझण, मन्याड या प्रमुख नद्या अजूनही कोरड्याठाक आहेत. शहराला पाणी पुरवठा करणारे दहेगाव धरण गेल्या दोन वर्षांपूर्वी भरले. मात्र आता त्यातील पाणीसाठा संपला आहे. नाग्या साक्या धरणातील मृत पाण्याचा साठा देखील कमी होवू लागला आहे. त्यामुळे टंचाईच सावट अधिक गडद होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
टँकरच्या मागणीत वाढ
पावसाअभावी तालुक्यातील विहिरी, तलाव, कोरडेठाक पडल्याने टँकरच्या मागणीचा रेटा वाढत आहे. सध्या टँकरच्या सुरु असलेल्या फेऱ्यामधून अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याने टँकरच्या संख्येत वाढ होतच आहे. पहिल्या पावसात भरणारे माणिकपुंज धरण क्षेत्रात वरील भागात दमदार पाऊस झालेला नाही.
तीच अवस्था नाग्यासाक्या धरणाची आहे. लघू प्रकल्पतील रणखेडा, धनेर, लोहशिंगवे, भालुर, पोखरी, कासारी (एक), कासारी(२) येथील कासारी एकचा अपवाद वगळता अन्य साठवण तलाव कधीच कोरडठाक झाले आहेत. सगळीकडे पडणारा पाऊस नांदगाव तालुक्यात तुरळक व विखुरलेल्या ठिकाणी कमी अधिक स्वरूपात पडतोय. मात्र त्यामुळे जमिनीची ओल होत असून जमिनीत खोलवर मुरणारा पाऊस मात्र अजूनही झालेला नाही .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.