नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेने शहरात ‘नो हेल्मेट - नो पेट्रोल' (no helmet no petrol) मोहिम यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रवास करायला निघायचं म्हणजे गाडीत पेट्रोल हवे आणि ते मिळवायचं तर डोक्यात हेल्मेट हवं हा आता जगण्याचा नियमच करायला हवा. जणू या मोहिमेच्या रूपाने हेल्मेट न वापरणाऱ्यांच्या मुळावरच घाव बसला आहे. असे असूनही काही महाभाग अजूनही पूर्णवेळ हेल्मेट घालायला तयार नाहीत. अशा प्रत्येकाने हेल्मेट नुसते पेट्रोल भरण्यासाठी नसून स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाला पण डोक्यात हेल्मेट असल्याने प्राण वाचल्याची उदाहरणे पाहिल्यास याची प्रचिती येते. असाच एक थरारक अनुभव नाशिकच्या अंकुश पाठकला आला. 'तो' प्रसंग आठवत अंकुशचे डोळे पाणावले.
शंभर फूट फरफटत जाऊनही वाचला जीव! तो प्रसंग आठवत डोळे पाणावले.
अंकुश मधुकर पाठक (रा. लामखेडे मळा, तारवालानगर, नाशिक) हा तरुण उद्योजक ९ फेब्रुवारी २०२० ला आपल्या दुचाकीने (एमएच १५ जीपी १११४) मुंबई येथे जात होता. कसारा घाटात रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे एका खड्यात त्याची गाडी घसरली. गाडी उतारावर असल्याने तसेच गाडीचा वेग ताशी ६० किमी असल्याने गाडी घसरून अंकुश गाडीसोबत तब्बल १०० फूट फरफटत गेला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका गंभीर होता, की त्याने घातलेल्या हेल्मेटची एक बाजू पूर्णपणे घासली गेली. त्या बाजूनं अक्षरशः भुगा झाला. पायाची लिगामेंट तुटली. सहा महिने त्याच्या पायाला फ्रॅक्चर होते. निव्वळ डोक्यात हेल्मेट होते म्हणून आज तू जिवंत आहेस असं हॉस्पिटलचे डॉक्टरांनी त्याला सांगितले तेव्हा त्याला जणू आपला पुनर्जन्मच झाल्याचा भास झाला असे अंकुशने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. हेल्मेटमुळेच माझा जीव वाचला असे अभिमानाने सांगतांना तो प्रसंग आठवत अंकुशचे डोळे पाणावले.
पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या नो हेल्मेट-नो पेट्रोल या मोहिमेचे मी स्वागत करतो. अपघात कसा होतो आणि तो झाल्यावर काय वेदना सहन कराव्या लागतात हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. एका हेल्मेटमुळे आपला जीव वाचत असेल तर मी सर्वांना विनंती करतो, की हेल्मेट सक्ती म्हणून नाही तर सुरक्षा म्हणून वापरा.
- अंकुश पाठक,नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.