शेकडो भुकेल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी धावले चांदवडचे हेलपिंग हॅन्ड!

helping hand.jpg
helping hand.jpg
Updated on

नाशिक : चांदवड शहरातून मुंबई-आग्रा महामार्ग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे, तर दुसरा हमरस्ता मनमाडच्या दिशेने जातो. सायंकाळच्या उतरत्या उन्हात लेकराला पाठीवर टाकून, डोक्‍यावर फाटका संसार घेऊन प्रवास करणारी माता...झाशीच्या राणीसारख्या पाठीवर बांधलेल्या लेकराचा काळीज चिरून जाणारा रडण्याचा आवाज...उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यापर्यंत ही वेदना पोचली. अन् त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळासाठी दूध पाठविले. अन् शेकडो भुकेल्या पोटांसाठी सज्ज झाले हेल्पिंग हॅन्ड... 

हेल्पिंग हॅन्ड ग्रुपने चंग बांधला...

ती सांगत होती, मुंबईहून पायी निघालोय भाऊ. नांदेडला जायचंय. वाटेत अडीचशे किलोमीटरच्या प्रवासात खिचडी सोडून दुसरं काही खायला मिळालं नाही. पोटात काही नसल्यानं अंगात दुधाचा थेंब उतरेना, पण लेकरू नुसतं अंगाला झोंबतंय. त्याला कसं सांगू, की दूधचं नाही तर तुला कसं पाजू? 
बाजूला हतबल होऊन लेकराचा बाप बसला होता. मनमाडपर्यंत त्यांना एका ट्रॅक्‍टरमध्ये बसवून देण्याची सोय डॉ. सतीश गांगुर्डे, गणेश खालकर, विकी गवळी यांच्या मदतीने केली. दूध मिळाल्यानंतर त्या मातेने जोडलेले हात, अबोध बाळाने टाकलेला कटाक्ष पाहून हेल्पिंग हॅन्ड ग्रुपने चंग बांधला, की चांदवड शहरातून एकही लेकरू उपाशी जाऊ द्यायचं नाही. काही दुधाची व्यवस्था करून वाटायला गेले, तर बोर्नव्हिटा टाकून दिलेलं दूध भुकेल्या लेकरांनी क्षणार्धात संपवलं. रस्त्यावर शेकडो लेकरं होती. काही भुकेने रडताना, तर काही रडून दमल्याने आईच्या खांद्यावर मान टाकून विसावलेली. रडून रडून काळा-लाल झालेला चेहरा मायेच्या पदराआडूनही भडक दिसणारा. अनेक हात पुढे आले. कसलेही तरी निमित्त उपयोगी पडू लागले. 

शेकडो भुकेल्या लेकरांच्या पोटाची सोय...

सागर जाधवचा वाढदिवस होता. त्याने काही रक्कम दिली. दूध अभियानाला मोठा आधार मिळाला. धुळे जिल्ह्यात थाळनेर पोलिस ठाण्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम करणारे सचिन साळुंखे यांनीही काही रक्कम पाठवली. आसिफ घासी व गोपाल आहेर यांनी एक डिझाइन केली व पायी जाणाऱ्या स्तनदा माता व लेकरांसाठी आम्ही दूध पुरवू, असं सांगून मदतीचं आवाहन केलं. क्षणार्धात शेकडो लोकांनी ते आवाहन पुढे पाठवले. हेल्पिंग हॅन्ड ग्रुपचे सदस्य महामार्गावरील टोलनाक्‍यावर पहिल्यांदा थोडं दूध घेऊन थांबलो तर ते काही क्षणांत संपलं. हळूहळू दूध वाढवलं अन्‌ आठ दिवसांत दोन हजार 100 लिटरवर दूध शेकडो भुकेल्या, पण आईचा पान्हा आटल्याने दूध न पिऊ शकणाऱ्या लेकरांच्या पोटात गेलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.