Nashik News : कोणतीही चूक नसताना, विवाह केलेल्या पत्नींकडून खोटेनाटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक अन् आर्थिक त्रासासह अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा त्रस्त पतींनी शनिवारी (ता.१४) गोदाघाटावर पत्नींच्या नावे पिंडदान करीत मुंडण केले.
राज्यभरातील आलेल्या त्रस्त पतींनी पिंडदान करीत मुंडण केले. कायद्याने नव्हे, तर धार्मिक परंपरा अन् रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटकारा मिळावा, यासाठी हे कृत्य केल्याचे समर्थन करीत अत्याचारी पत्नींविरोधात पुरुष हक्क संरक्षणाचीही या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबईतील वास्तव फाउंडेशन आणि पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे पत्नींचे पिंडदान व मुंडण उपक्रम गोदाघाटावर करण्यात आला. (husband do pind daan due to trouble of wife on sarvapitri amavasya nashik news)
रामतीर्थ परिसरात शनिवारी सकाळी कोलकात्यासह मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील पत्नींच्या खोट्या-नाट्या गुन्ह्यांमध्ये त्रस्त असलेल्या आणि अशा पत्नींपासून मानसिक-भावनिकदृष्ट्या सुटकारा मिळावा, यासाठी न्यायालयांमध्ये कित्येक वर्षांपासून घटस्फोटासाठी दावे दाखल केलेल्या पतींनी पत्नींच्या नावाने पिंडदान केले.
त्यानंतर मुंडण केले. हिंदू धार्मिक परंपरा अन् रितीरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडतो. त्या वेळी पत्नी म्हणून आलेल्या महिलेच्या मनाविरुद्धही लग्न झालेले असते. बऱ्याचदा ती पतीच्या घराची जबाबदारी सांभाळण्यात अयशस्वी होते. त्यामुळे पती-पत्नींमध्ये मनोमीलन होत नाही. परिणामी, पत्नीच खोटे-नाटे आरोप करीत पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत खटले दाखल करते.
महिला संरक्षण कायद्याचा गैरवापर केला जातो. परिणामी, पतीसह त्याच्या कुटुंबीयांची मानसिक, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा पणाला लागते; तर दुसरीकडे न्यायालयाने घटस्फोट दिला तरी पतीच्या मनातील पत्नीविषयीची भावना जात नाही. कारण नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच, हिंदू धार्मिक परंपरेत घटस्फोटाला मान्यता नाही. त्यामुळे त्यावर पिंडदान हाच एकमेव पर्याय आहे.
वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून अशा त्रस्त शेकडो पतींनी शनिवारी रामतीर्थावर एकत्रित येत आपल्या पत्नींच्या नावाने पिंडदान करीत मुंडण केले. तिच्यापासून कायमचा सुटकारा मिळावा, सुख-शांती लाभावी अशी भावना व्यक्त केली. तसेच, महिला हक्क आयोगाप्रमाणे पुरुष हक्क आयोगाची निर्मिती करण्याचीही मागणी केली. या वेळी निवृत्त प्रा. शंकर मोरे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात विधी केला. या वेळी पीयूष पांडे, राजू धनावडे, सुनील मिश्रा, सतीश गुप्ता आदींसह पत्नीपीडित उपस्थित होते.
"काहीही चूक नसताना पुरुषांना पत्नींमुळे कायद्याच्या ससेमिरेला सामोरे जावे लागते. त्यामुळे मानसिक व भावनिक खच्चीकरण झालेले असते. कोणतेही नाते संपुष्टात आणण्यासाठी आपण पिंडदान करीत असतो. त्याच संकल्पनेवर आधारित आम्ही पत्नींचे पिंडदान करीत त्रस्त पतींच्या मनातील भीतीला घालविण्याचा प्रयत्न केला आहे." - अमित देशपांडे, अध्यक्ष, वास्तव फाउंडेशन, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.