Nashik News : यंदा राज्यात अनेक राजकीय फेरबदल झाले. सत्ताधारकांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचा धडाकाच लावला. मात्र, इगतपुरी तालुकाचा विकास होईल, या आशेवर असणाऱ्या नागरिकांचा यंदाही भ्रमनिरास झाला.
धरणांचा राजा समजल्या जाणाऱ्या इगतपुरीचा जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रभर नावलौकीक आहे. मात्र, येथील जनतेच्या समस्या आजही तशाच आहेत. पंचायत समिती व नगरपरिषदेवर ‘प्रशासकराज’ असल्याने अधिकाऱ्यांचा मक्तेदारीमुळे सर्वसामान्यांची कामे रखडत आहे. -पोपट गवांदे (Igatpuri taluka waiting for development nashik recap 2023 news)
तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील त्रुटी, आरोग्य विभागाचा बोजावरा, प्रत्येक विभागात अधिकारी व कर्मऱ्यांची रिक्त संख्या, निश्चित नसलेले पर्यटनाचे धोरण, स्थानिक तरुणांना रोजगाराचा प्रश्नासहीत विविध क्षेत्रात झालेली पिछेहाटमुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही. इतिहासाचा भक्कम आधार असलेल्या तालुक्याचे वर्तमान तेवढेसे समाधानकारक नाही.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्गसौंदर्य लाभलेल्या तालुक्यात सुमारे १०४ ग्रामपंचायतीसह एकूण २०० गावांचा समावेश आहे. त्यातील टाकेद गट सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडला आहे. या गटातच सुमारे ४o गावांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याला दोन- दोन आमदार लाभले खरे.
मात्र, विकास तालुक्यातून कोसो दूर आहे. शासनाने कितीही कोटी रुपयांच्या योजना राबविल्या, तरी शासन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन योजना बनवत नाही, तोपर्यंत त्या यशस्वी होणार नाहीत. जलजीवन योजनेच्या कामांसाठी करोड रुपयांची उधळपट्टी केली जाते. ती योजना राबविताना एकाही गावाला विश्वासात घेतले नाही. फक्त ठेकेदारांचे हित बघून योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सर्व पैसा वाया जाणार आणि पुन्हा महिलांच्या डोक्यावर हंडा येणार.
टाकेद गटातील ४० गावांचा विकास न झाल्याची शोकांतिका आहे. निवडणुका आल्या, की विकासकामांचा फतवा घेऊन उमेदवार धावतात. नंतर त्यांना विसरच पडतो. तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम व डोंगराळ आहे. तालुक्याचे भवितव्य अधांतरी आहे. त्याला दूरदृष्टीचा अभाव हे कारण आहे. तालुक्याकडे लक्ष दिले गेले नाही.
राजकीय मंडळीचे झालेले दुर्लक्ष, अधिकाऱ्यांनी दाखविलेली उदासीनता व जनता विसरत चाललेली चळवळ. त्यामुळे इगतपुरी तालुका विकासापासून कोसो दूर आहे. भौगोलिकदृष्ट्या विशाल असलेल्या तालुक्याला सर्वांत अधिक भेडसावणारी समस्या म्हणजे पाणी. आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. शेताला सोडा, पण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी येथील जनतेला भटकंती करावी लागते, ही खरी शोकांतिका आहे.
धरणाचे पाणी आहे, पण ते आरक्षीत आहे. ‘धरण उशाला अन् कोरड घश्याला’, अशी गत येथील जनतेची झाली आहे. तालुक्याला पाणीदार नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या प्रतिक्षा आहे. केवळ पाणी योजना मंजूर झाल्यानंतर भुमिपूजनाचे फोटोसेशन होते. मात्र, योजना केवळ कागदावरच राहते.
तालुक्यात सुमारे १२ ते १४ धरणे असूनही तालुका पाण्यासाठी वणवण भटकत आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला, पण तालुक्यातील किती क्षेत्र सिंचनाखाली आले, हा संशोधनाचा विषय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.