Nashik Crime : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवैध गौण खनिज माफियाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, महसूल विभाग या प्रकाराबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
गोदाकाठ भागात अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुळाट झाला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतूक संपूर्ण रात्रभर चालू असते. राजरोसपणे माती, मुरमाचा बेबंद उपसा सुरू आहे. गौण खनिजाचे उत्खनन होत असताना महसूल अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत नाहीत, हे विशेष.
गोदाकाठमधील महाजनपूर, पिंपळगाव निपाणी भागासह इतर ठिकाणाहून माती, मुरूम मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला. (Illegal minor mineral mafias have created havoc in gorakhnath area nashik news)
तसेच, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, तळवाडे या भागात मुरमाचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे. महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने या मागचे गौडबंगाल काय आहे, हे समोर आल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही.
अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी, तसेच मंडलाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. गौण खनिजावर लक्ष ठेवणे हे तलाठ्यांचे आद्य कर्तव्य आहे. गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठ्यांनी केले पाहिजे.
तसेच, रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौण खनिजाचे परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्खनन होत आहे किंवा नाही, यावर देखरेख ठेवण्याचे कामही तलाठ्यांचेच असते. परंतु, प्रत्यक्षात गोदाकाठ परिसरात प्रांत व तहसीलदार यासह इतर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
गोदाकाठ भागात काही ठिकाणी नावाला रॉयल्टी भरली जाते. रॉयल्टी भरलेल्या गौण खनिजाचे कित्येक जादा पटीने उत्खनन होत असताना कारवाई केली जात नाही. रॉयल्टी भरलेल्या जागेवर साधी पाहणी केली जात नाही. यामागे महसूल विभाग कोणते हितसंबंध जोपासत आहे, हे अनाकलनीय आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचे नुकसान होत आहे. ओव्हरलोड आणि सुसाट चालणारी वाहने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच, वाहनांवर नंबर नसल्याने अपघात झाल्यास वाहन ओळखणे अवघड होत असते. अवैध खनिज माफियांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून, गट-तट पडलेले आहेत, तेच एकमेकांची टीप देत अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ उपलब्ध करून देत आहे.
गोदाकाठ भागात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असून, त्याला आर्थिक लागेबांध्याची किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. दरम्यान, एक खासगी व्यक्ती कलेक्शन करून पॉकेट संबंधितांना पोहोच करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
महसूल ॲक्शन मोडवर येणार का?
गोदाकाठ भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक झाली आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा ॲक्शन मोडवर येऊन कडक कारवाई करतील का? हे पाहण्याची आवश्यकता आहे.
चौकशीचा फार्स नको
गौण खनिजाच्या उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच, या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशीचा फार्स न करता दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.