Sand Transport News : तालुक्यातील गिरणा-मोसमसह इतर लहान नद्यांमधून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी चाप बसविला आहे. नदी काठावरील वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीने खोदण्यात आले आहेत. असे असले तरी संबंधितांनी पर्यायी रस्ते शोधून काढत बैलगाडीने वाळू वाहतूक सुरूच ठेवली आहे.
कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन मध्यरात्रीनंतर ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात आहे. शेती प्रयोजनात बैलगाडीचा समावेश आहे. त्यामुळे बैलगाडीवर कारवाई करता येत नाही, याचा फायदा घेत बैलगाडीवरुन वाळू वाहतुकीचा नवा फंडा येथे सुरु आहे. (illegal Transport of sand by bullock carts after midnight nashik news)
तालुक्यात वाळू व गौण खनिज मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकदारांविरुध्द तहसीलदार देवरे यांनी गेल्या महिन्यापासून कारवाईला सुरवात केली. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले. आघार, दाभाडी, नरडाणे, सवंदगाव आदी गावानजीक नदीकाठाला लागून असलेले वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीने खोदण्यात आले.
आठवडाभर बेकायदेशीर वाळू वाहतूक पूर्णपणे बंद होती. वाळूमाफियांनी पर्यायी रस्ते शोधून काढले. सध्या तालुक्यासह कसमादेत कडाक्याची थंडी पडत आहे. रात्रीचे तापमान दहा अंशापर्यंत खाली येत आहे. यामुळे सर्वत्र सामसूम राहत असल्याने मध्यरात्रीपासून ते पहाटे पाचपर्यंत वाळू वाहतूक केली जात आहे.
मुरूम व इतर गौण खनिज देखील बेकायदेशीररीत्या वाहून नेले जात आहे. तहसीलदारांनी यासाठी पथक नियुक्त केले आहे. दोन दिवसापूर्वीच अनधिकृत नऊ स्टोन क्रशर सील करण्यात आले.
तहसीलदार देवरे प्रामाणिकपणे काम करीत असले तरी महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे. पोलिस व महसूल प्रशासनाच्या मेहरबाणीमुळेच आजवर वाळू व गौण खनिज वाहतूक होत आहे.
चोरट्या मार्गांनी रात्री अपरात्री वाळू वाहतूक केली जात आहे. काहींनी तर बैलगाडीतून वाळू वाहतूक सुरु केली आहे. बैलगाडीचा समावेश शेती प्रयोजनासाठी होतो. नियमानुसार बैलगाडीला दंड आकारता येत नाही, याचाच फायदा घेतला जात आहे. तालुक्यात आघार, दाभाडी, नरडाणे, सवंदगाव, येसगाव आदी ठिकाणच्या वाळू उपसा डेपोसाठी शासनाने लिलावासाठी निविदा प्रसिद्ध केली होती, मात्र तिला प्रतिसाद मिळाला नाही.
"अवैध वाळू वाहतुकीला पायबंद घालण्यास प्रशासनास चांगले यश आले आहे. वाळू वाहतुकीसाठी चोरट्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. अशा मार्गांचा शोध घेऊन रस्त्याने जेसीबीने खड्डे केले जातील. नियमानुसार बैलगाडीवर दंड आकारता येणार नसला तरी संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल. या संदर्भात बैठक घेऊन विभागात पथकांची नियुक्ती केली जाईल. अवैधरीत्या वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल." - नितीनकुमार देवरे, तहसीलदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.