Nashik News : शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पारंपरिक बोहाडा उत्सवाची मंगळवारी (ता.२०) पहाटे जोशी घराण्याकडे प्रमुख आकर्षण असलेल्या नरसिंह - हिरण्यकश्यपू ही मानाची सोंगे काढून सांगता झाली.
ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज देवस्थानच्या प्रांगणात ऐतिहासिक ओळख असलेल्या गावाने धार्मिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत लोकसंकृती जोपासली आहे. (In festival folk culture was presented through traditional bohada by wearing various costumes nashik news)
येथे धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपरिक बोहाडा उत्सवास गुरुवारी (ता.१५) प्रारंभ झाला. पाच दिवस सुरू असलेल्या या उत्सवात विविध सोंगे घेऊन पारंपरिक बोहाड्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. या उत्सवासाठी विविध प्रकारचे पोशाख परिधान करून संबळच्या तालावर विशिष्ट प्रकारचा नाच केल्याने करमणुकीबरोबरच मनोरंजन झाले.
बोहाडा पाहण्यासाठी पाचही दिवस गाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात महिला व युवक युवतींची उपस्थिती उल्लेखनीय होती. पारंपरिक संबळ वाद्यावर देव-देवतांची निघालेली सोंगे ज्येष्ठांबरोबर तरुणांनाही आकर्षित करू लागली आहेत. प्रत्येक सोंगाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
उत्सवात पहिल्या दिवशी गणपतीचे सोंग काढून प्रारंभ करण्यात आला. मोहाडमल्ल देवस्थान परिसरात रोषणाई करण्यात आली होती. उत्सवात शारदा, आसळका, भीम- बकासूर लढाई, इंद्रजित, रावण, वीरभद्र, दक्षराजा, खंडेराव, भैरोबा, पंचमुखी महादेव, ध्रुवबाळ, गजासूर, वेताळ, सातीआसरा, घटत्कोच, हेडंबा, अभिमन्यू, झोटिंग, भिल्लीनी, देवी, म्हसोबा, यम, नारद, मासा, गौळणी, काट्यामारुती, भस्मासूर, भगत- भूतळ्या आदी सोंगांचा समावेश होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सतीश काळे हे नाचविलेल्या प्रत्येक सोंगाची (सपादनी) विचारणा 'हे कोण आले' अशी करत, त्यावर शंकर ठाकूर प्रत्येक सोंगाची पुराणातील कथास्वरूपात मनोरंजक शैलीत माहिती देत होते. वाजंत्रीच्या तालावर पवित्रा व संबळच्या तालावर ठेका धरत अनेक सोंगांनी तालबद्ध नृत्य करून उपस्थितांचे मने जिंकली.
उत्सवात पूर्वीपासून नाभिक समाजाचे दिवंगत श्रीकृष्ण नेवकर यांच्या घराण्याकडे असलेल्या वीरभद्राचा रोषणाईचा फिरता टोप त्यांचे नातू आकाश व पुतण्या गणेश यांनी संबळ वाद्याच्या तालावर नाचविला. पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला. बोहाडा उत्सव यशस्वितेसाठी पंच आबासाहेब जाधव, लक्ष्मण पाटील, दत्तात्रय मौले, शांताराम निकम, लक्ष्मण कळमकर, सुदर्शन जाधव, कैलास कळमकर, विजय देशमुख, बाबा निकम आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशील होते.
'पावित्र्य' आणि 'पवित्रा'
बोहाडा उत्सवात सोंग नाचविताना पावित्र्य आणि पवित्रा यांना विशेष महत्त्व दिले जाते. पूजा, नैवेद्य, उपवास करून सोंगांचे पावित्र्य राखण्यात येते. संबळच्या चालीवर विशिष्ट ठेक्यावर नाचण्याच्या कलेला पवित्रा म्हटले जाते.
काही घराण्यांकडून दरवर्षी विशिष्ट सोंगेच नाचविले जातात. सोंग नाचविताना तरुण पिढीला ज्येष्ठांकडून पवित्र्यावर सोंग नाचविण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यातच घरातील सोंग नाचविण्याच्या परंपरेमुळे चिमुकल्यांना आपसूकच पवित्र्यावर नाचण्याची शिकवण मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.