ब्रह्मगिरी पर्वतावर जंगलनिर्मितीचा ‘श्रीगणेशा’

त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी अविरल अन्‌ अविरत वाहण्यासाठी कुंड पुनरुज्जीवनाचा संकल्प
Inauguration of forest formation on Brahmagiri mountain
Inauguration of forest formation on Brahmagiri mountainSakal
Updated on

नाशिक - सह्याद्रीच्या रांगेतील ब्रह्मगिरी पर्वतावर जंगलनिर्मितीसाठी झाडे लावण्याचा ‘श्रीगणेशा’ पर्यावरणदिनानिमित्त रविवारी (ता. ५) झाला. वैतरणा, अहिल्या, गोदावरी नद्यांचे उगमस्थान हिरवाकंच करण्यासाठी स्थानिक प्रजातीची झाडे लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर गोदावरी अविरल अन्‌ अविरत वाहण्यासाठी कुंडांचे पुनर्जीवन करण्याचा संकल्प झाडे लावण्याच्या कार्यक्रमात करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या ‘ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता’ या संकल्पनेवरील आधारित चळवळीचा प्रारंभ अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते बेलाचे झाड लावून करण्यात आला. नमामि गोदा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी, सत्संग फाउंडेशन आणि त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका या चळवळीत सहभागी झाली आहे. श्री. उदगीरकर यांनी स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत, त्यांचे संरक्षण आणि संगोपन नमामि गोदा फाउंडेशनतर्फे केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

त्यानुसार रविवारी सायंकाळी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी अटल आखाड्याच्या जागेत झालेल्या झाडे लावण्याच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नमामि गोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, रोटरीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण, उद्योजक तुषार चव्हाण, अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज, चित्रपट निर्माता संजय झनकर, नीलेश दादा महाराज, सरपंच दत्तू ढगे, मनोज साठे, प्रशांत परदेशी, चंद्रकांत पाटील, ऋषीकेश नाझरे, स्वामी सोमेश्‍वरानंद गुरूकुलच्या योगिता अग्रवाल यांचा सहभाग राहिला. गोदावरी बारमाही वाहती राहण्यासाठी ब्रह्मगिरीवर पुन्हा जंगल उभारणे आवश्‍यक असून, पर्वताच्या परिसरातील शंभराहून अधिक कुंडांचे पुनर्जीवन आवश्‍यक बनले असल्याचे चिन्मय यांनी सांगितले.

त्र्यंबक नगरपालिकेचे ‘ट्री-गार्ड’

ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी लागवड करण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी स्वामी सोमेश्‍वरानंद गुरूकुलने स्वीकारली आहे, तसेच त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेतर्फे झाडांना ‘ट्री-गार्ड’ बसविण्यात येतील, असे श्री. लोहगावकर यांनी जाहीर केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावातंर्गत उपलब्ध झालेला निधी आणि ब्रह्मगिरीसाठी तारेचे कुंपण करण्यासाठी वन विभागाला दिलेला १७ कोटींचा प्रस्तावाची माहिती श्री. लोहगावकर यांनी या वेळी दिली. रोटरीतर्फे या उपक्रमात सक्रिय योगदान देण्यात येईल, असे सौ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. याशिवाय पुढील रविवारी (ता. १२) सायंकाळी याच भागात बांबूंची झाडे लावण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. झाडे लावण्याच्या कार्यक्रमावेळी महंत उदयगिरी यांनी स्वतः झाडे योग्य ठिकाणी कशी लावली जातील, याची खात्री करून घेतली. दरम्यान, नमामि गोदा फाउंडेशनतर्फे ब्रह्मगिरीवर वृक्षराजी फुलविण्यापासून गोदावरी सतत वाहती राहावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आराखडा तयार करण्यात येत असून, त्यात लोकसहभागाच्या जोडीला सीएसआर निधीची मदत घेण्यात येणार असल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.

नाशिक देवराईमध्ये बांबूंची लागवड

आपलं पर्यावरण संस्थेतर्फे पर्यावरणदिनानिमित्त नाशिकच्या देवराईमध्ये आठवा वन महोत्सव साजरा करण्यात आला. एक हजार बांबूंची लागवड करण्यासाठी विविध कंपन्यांचे, समूह सामाजिक संस्थांसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड यांनी नाशिककरांसाठी ‘ऑक्सिजन प्लँट’ उभे करण्यासोबत वृक्षराजीच्या लागवडीप्रमाणे त्यांच्या संगोपनाची चळवळ अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. आजच्या वन महोत्सवासाठी पश्‍चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वन कर्मचारी आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील उपस्थित होते. कृतिशील पर्यावरण दिन साजरा करीत असतानाच बांबूंच्या प्रजातींची लागवड व त्यापासान होणारे जीवनावश्‍यक वस्तूंचे उत्पादन व उपजीविका या विषयावर सेवानिवृत्त वनाधिकारी भास्कर पवार, बांबू तज्ज्ञ अजित टक्के यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सुजाता काळे, राहुल आहिरेकर, गिरीश कांगणे, भीमा डहाळे, करण भोई, मयूर तातार, पूजा लढ्ढा, शशिकांत सानप, गौरी गायकवाड यांचा बांबू लागवडीच्या कार्यक्रमात पुढाकार राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.