देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील विठेवाडी येथील धाराशिव साखर कारखाना लिमिटेड, युनिट २ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (ता. २५) छापा टाकला. याबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात असून, चौकशी सुरू असून, आम्ही काही माहिती देऊ शकत नसल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. (Income Tax Department raids Vasantdada patil sugar factory Nashik latest marathi news)
डिव्हीपी ग्रुपतर्फे चालविण्यात येत असलेल्या धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने २५ वर्षांसाठी ‘वसाका’ भाडेतत्त्वावर घेतला आहे. अभिजित पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गुरुवारी (ता. २५) सकाळी सहाच्या सुमारास दोन कारमधून काही अधिकारी ‘वसाका’ कार्यस्थळावर आले असल्याचे समजते.
हिंदीतून बोलणाऱ्या या अधिकाऱ्यांनी अकाउंट अर्थात, लेखा विभागात चौकशीला सुरवात केली. प्रत्येक रजिस्टरमधील नोंदींची सविस्तर माहिती घेतली जात आहे. सायंकाळपर्यंत तपासणीचे काम सुरू होते. याबाबत उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्तिकर विभागाकडून समजू शकली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिकारी कधीपर्यंत ठाण मांडून बसतील, याबाबत सांगता येणार नसल्याचे सांगितले. कारखाना व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी यांना आतच ठेवले असून, कुणालाही बाहेर निघू दिले जात नाही. तसेच त्यांचे मोबाईलही जमा करण्यात आले आहेत. या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असून, कारखाना स्थळावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडे एकूण पाच कारखाने आहेत. धाराशिव कारखान्यासह पंढरपूर, उस्मानाबाद व इतर कारखान्यांसह श्री. पाटील यांच्या निवासस्थानीही छापा टाकत कारवाई सुरू असल्याचे समजते. साखर उद्योगातील ‘साखरसम्राट’ अशी अभिजित पाटील यांची ओळख आहे.
‘वसाका’ स्थापनेपासून पहिल्यांदाच येथे प्राप्तिकर विभागाचा छापा पडल्याने तालुक्यात या कारवाईची चर्चा जोरात होत आहे. यातून काय निष्पन्न होईल, ते आताच सांगता येणार नसले तरी सहकार तत्त्वावरचा हा कारखाना २०१८-१९ पासून भाडेतत्त्वावर देण्यात आल्याने या कारखान्याला प्राप्तिकर विभागाला तोंड देण्याची वेळ आल्याने सभासदांसह कर्मचारी व कामगार वर्ग याकडे लक्ष ठेवून आहे.
"‘वसाका’ राज्य सहकारी बँकेच्या बोजातून मुक्त करण्यासाठी तो २५ वर्षांसाठी धारशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा झाला आहे. खरंतर तो राज्य बँकेच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत व सभासदांनी सुचवलेल्या अभ्यासू सल्लागारांच्या मदतीने बँकेने चालवला असता, तर कमी वर्षांत तो कर्जातून मुक्त झाला असता. भाडेतत्त्वावर देतानाही तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती दिल्याने ‘वसाका’वर प्राप्तिकर विभागाचा छापा टचाची धाड पडल्याने त्याचे स्पष्ट परिणाम आता दिसू लागले आहेत."
- शांतारामतात्या आहेर, माजी आमदार तथा माजी अध्यक्ष, वसाका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.