Nashik News : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर असलेल्या विविध धार्मिक स्थळांपैकी एक व पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या शीतकडावरून वर्षभरात पाच-दहा आत्महत्येचे प्रकार घडत असल्याने हा भागाची सुसाईड पॉइंट म्हणून कुप्रसिद्धी होऊ नये यासाठी शीतकड्याचे सध्या असलेले संरक्षक कवच आणखी वाढवावे, जेणेकरून अशा घटना घडणार नाही अन कुणीही सेल्फी अन आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही अशी उपाययोजना ट्र्स्टसह प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
गडावर दोन दिवसांपूर्वीच दोन बेपत्ता तरुणांचे मृतदेह शितकड्याखाली आढळले. अशा घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासन, वनविभाग, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृंग ग्रामपंचायतीने यांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. (Increase protective cover of shitkada on wani gad incidence of suicide alarming Nashik News)
सप्तशृंगगडाच्या पूर्वेला असलेला मार्कण्डेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजूबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे असा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर भाविकांबरोबरच तरुणाईला भुरळ पाडतो.
रात्रीच्या वेळेस येथे पथदीप नसल्याने या भागात जास्त कोणी फिरकत नाही. शीतकडयाचा परिसर हा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने या भागात वन विभागातर्फे दुर्घटना टाळण्यासाठी लोखंडी खांब व पाइप टाकून कड्यापासून आठ- दहा फुटावर संरक्षक बॅरिकेटस उभारले आहे.
असे असले तरी या संरक्षक बॅरिकेटसवर चढून किंवा दोन पाइपमधून सहजरित्या शिरून काही तरुण सेल्फीसाठी किंवा आत्महत्येसाठी धोकादायक अशा शीतकड्यावर जातात. त्यामुळे या भागात वर्षभरात पाच- सात आत्महत्येच्या किंवा घातपाताच्या घटना घडत असल्याने हे ठिकाण सुसाईड पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध होत चालले आहे.
त्यात गडावरील शीतकड्यासह सर्व भाग हा कळवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर शीतकड्याच्या खालील भाग हा वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे आत्महत्येचे प्रकार किंवा घातपात होऊन कड्याखाली पडलेल्या मृतदेहाचा पंचनामा व गुन्हा वणी पोलिस ठाण्यात नोंद केला जातो.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सप्तशृंगगड निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत व वनविभाग या संस्थांनी पुढाकार घेऊन शीतकडा परिसरात आठ ते दहा फूट उंचीची संरक्षक जाळी, विजेचे दिवे बसवून कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा व वॉचमनची नेमणूक करणे गरजेचे आहे.
"शीतकडा हा भाग वनविभागाच्या हद्दीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी पाइप रेलिंग केलेली आहे. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने उंच लोखंडी जाळी बसविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करीत आहोत."
- दीपावली गायकवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी, कळवण.
"ट्रस्टतर्फे वनविभागाकडे शीतकडा भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना बरोबरच परिसरात गार्डन, निवारा शेड आदी कामांसंदर्भात परवानगीचे प्रस्ताव दिलेले आहेत, मात्र याबाबत परवानगी मिळत नसल्याने ट्रस्ट व इतर विभाग काम करण्यास इच्छुक असूनही कामे करता येत नाही." - भूषणराज तळेकर, विश्वस्त, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट.
"शीतकडा परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्याने ग्रामपंचायतीला कुठलेही काम करता येत नाही. या ठिकाणी पाइप रेलींगबरोबरच संरक्षक जाळी बसविण्याची मागणी वनविभागाकडे केलेली आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरु आहे."
- संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.