नाशिक : अनिवासी भारतीयांसाठी खास समजल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या भारतीय प्रवासीदिन सोहळ्यासाठी यंदा राज्यातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सहा युवकांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे. (Indian Travelers Day Celebration Special invitation to 6 youths of Maharashtra for Travelers Day Nashik News)
दर वर्षी ९ जानेवारीला भारतीय प्रवासी दिन साजरा होतो. यंदा १८ वा भारतीय प्रवासी दिवस ८ ते १० जानेवारीदरम्यान इंदूर (मध्य प्रदेश) येथे साजरा होणार असून, राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, केंद्रीय युवामंत्री यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच ५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. परदेशात राहून भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या भारतीयांचा सन्मान करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश असतो. ९ जानेवारीला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले होते. त्यामुळे २००३ पासून हा दिवस साजरा होतो.
तसेच, देशातील तरुण पिढीला परदेशात काम करत असलेल्या भारतीयांशी सुसंवाद होत राहावा, हादेखील एक उद्देश यामागे असू शकतो, असे मानले जाते. प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना दिवंगत लक्ष्मीमल सिंघवी यांनी मांडली होती.
यंदा या दिनानिमित्त अनिवासी भारतीयांचे व देशातील युवकांचे संबंध दृढ होण्यासाठी विचारांचे आदानप्रदान होण्याच्या उद्देशाने देशातील विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या ५० युवकांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय युवक कल्याण व खेळ मंत्रालय व मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सहा युवक सहभागी होणार आहेत.
त्यात जव्वाद पटेल (अकोला), विनीत मालपुरे (नाशिक), ओंकार नवलिहाळकर (कोल्हापूर), प्रवीण निकम व सौरभ नावंदे (पुणे) आणि विजिता नायर (धुळे) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.