दीड वर्षाची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं... विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी तालुक्यातील रहिवासी म्हणून येणाऱ्या अडचणींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं... परिस्थितीमुळे शाळेचं तोंडही त्या पाहू शकल्या नाहीत.
मात्र, अडचणी प्रत्येकाच्याच वाट्याला येतात, त्यातूनही नक्कीच मार्ग निघतो, यासाठी आपले विचार सकारात्मक हवेत, या आत्मविश्वासातून त्यांनी स्वतःलाच आव्हान देत अडचणीतून वाट काढण्याचा जणू विडाच उचलला.
आयुष्यातील प्रत्येक संकटात संधी शोधत स्वतःला सिद्ध करतानाच समाजाचं देणं लागतो, या भावनेतून आदिवासी महिलांमध्ये उजेड पेरत शिवणकामातून सुमारे साडेतीन हजार महिलांच्या आधार बनल्या, त्या पेठ येथील सुमित्राताई जाधव... (Inspirational Story Domkhedaks Sumitratai become support of Tribal Women nashik)
सुमित्राताई जाधव यांचं माहेर डोमखडक (ता. पेठ) येथील... त्यांचे वडील नारायण जाधव यांच्याकडे अल्प शेती. नारायण यांच्या घरी पत्नी गोदाबाई यांच्यासह दोन मुली व मुलगा असा परिवार.
सुमित्राताई कुटुंबातील सर्वांत शेवटच्या सदस्या. मात्र, त्या दीड वर्षाच्या असतानाच नियतीनं वडिलांचं छत्र हिरावून नेलं. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आई गोदाबाईंवर होती. मुलांचं संगोपन करतानाच परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या आईंनी सुमित्राताईंना मोठं केलं.
दहा वर्षांच्या असतानाच आईबरोबर मजुरीसाठी त्यांना बाहेर पडावे लागले. दोन पैसे मिळविण्यासाठी असलेल्या धडपडीत मात्र त्यांना शाळेची पायरीही चढता आली नाही. सुमारे सात वर्षे मजुरीचे काम करीत त्यांनी परिस्थितीशी लढाई सुरू ठेवली.
त्यांनी स्थलांतरित कुटुंबांबरोबर नाशिकचा रस्ता धरला. नाशिकच्या मोरवाडी परिसरातील चाकरमान्यांच्या वस्तीत राहतानाच पडेल ते काम करीत त्यांची धडपड सुरू होती.
कंपन्यांमध्ये हंगामी कामातून मिळालेल्या पैशांतून त्या घराकडेही पैसे पाठवू लागल्या. हातात येणाऱ्या पैशांतून पोटाला चिमटा देत त्या शिवणकाम शिकल्या. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीला वाट सापडली.
अंबड औद्योगिक वसाहतीत हंगामी कामगार म्हणून सुमित्राताई हँडग्लोज तयार करण्याचे काम करीत होत्या. कंपनीतील कामाबरोबरच घरी आल्यावर त्या शिवणकामातील आपले कसब भक्कम करीत राहिल्या.
शिवणकामामुळे त्यांना कंपनीतील कामही घरी मिळत गेले. आपल्या कुशल कामाचा फायदा गावाकडील आदिवासी महिलांना मिळावा, यासाठी त्यांची धडपड सुरू होती. यातूनच त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमित्राताई यांनी काम केलेल्या कंपनीकडून घरगुती कामही मिळण्यासाठी मदत झाली.
महिलांसाठी बनल्या आधार
डोमखडकपासून पेठचे अंतर जवळ असल्याने त्यांनी पेठ येथेच झोपडीत आपला संसार थाटला. कंपनीकडून हँडग्लोज शिवण्याचे काम त्यांना मिळाल्याने मोठा आधार मिळत गेला. याच काळात आदिवासी महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी त्या सरसावल्या.
महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देतानाच सांघिक प्रयत्नांतूनच आपण पुढे जाऊ शकतो, याबाबत समुपदेशन करतानाच शिवणकामाचे धडे देण्यास त्यांनी सुरवात केली. आयुष्यात समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने समोर असलेले ध्येय त्यांना खुणावत होते.
तीन वर्षे हँडग्लोज तयार करण्याचे असलेले काम बंद झाले. मात्र, याच काळात महिलांसाठी त्या समाजशिक्षिका बनल्या. गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेतीन हजार आदिवासी महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. यातून सुमारे अडीच हजारांवर महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
स्वतःच उभे केले मार्केट
प्लास्टिकबंदी तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे महत्त्व लक्षात घेत त्यांनी महिलांना शिवणकामाचे धडे देतानाच बाजारासाठी लागणाऱ्या पिशव्या शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी सुमारे ३०० पिशव्या तयार करीत त्या आठवडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देताहेत.
आदिवासी महिलांमध्ये उजेड पेरताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ‘तनिष्का’ गटप्रमुख शीतलताई रहाणे यांच्यासह आई गोदाबाई, मुलगा विश्वनाथ राऊत, भाऊ हेमराज, भावजय जनाबाई यांच्यासह आदिवासी भागातील माणुसकीने दिलेल्या पाठबळामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकली, हेही त्या सांगायल्या विसरल्या नाहीत.
परिस्थितीमुळे शाळेची पायरीही न चढलेल्या सुमित्राताई यांनी पाचवीत शिकणारा मुलगा विश्वनाथच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवतानाच आपल्याला वंचित राहावे लागलेल्या शिक्षणाची कसर भरून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.