Inspirational Story : शेतकरी कुटुंबात जन्म, शिक्षण अर्ध्यावरच सुटलेले... रोजीरोटीच्या लढाईत मुंबईत थाटलेला संसार थेट नाशिकला हलविला... संस्कारक्षम कुटुंबातून पुढे जाताना आयुष्यात अचानक आलेल्या उलटफेरमुळे कष्ट जणू पाचवीलाच पूजलेले.
मात्र, तरीही त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलणार, या सकारात्मक विचारांनी प्रयत्न सुरू होते... पतीच्या आजारपणात खंबीरपणे उभे राहत कुटुंबाची सूत्रे स्वतःकडे घेतली. (inspirational story of Idols become decoration for tired minds nashik news)
परिवाराला भक्कम करीत जिद्दीच्या जोरावर व्यवसायाच्या वाटा तुडवितानाच बारदाण शिवण्याच्या कामावर लक्ष केंद्रीत केले. स्वतःमधील सुगरणीला भक्कम करीत केवळ आठवी उत्तीर्ण असतानाही केटरिंग व्यवसायातून उद्योजिका म्हणून ओळख उभी केली, त्या नवीन नाशिकच्या राजरत्ननगर येथील शोभाताई केदारे-तपासे यांनी...
शो भा जयमल्हार केदारे... शिक्षण केवळ आठवी उत्तीर्ण. माहेर नगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील, तर सासर नाशिकचे. वडील मेघनाथ यशवंत तपासे यांचे पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासह चार मुली, एक मुलगा असा परिवार... शेतकरी कुटुंबात कष्टाशिवाय पर्याय नसला, तरी संस्कारांची शिदोरी या परिवाराने जपली होती. शोभाताईंच्या विवाहामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले.
तपासे कुटुंब उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले होते. पती जयमल्हार यांचेही शिक्षण जेमतेम असल्याने कुटुंबाने सुरू केलेल्या किराणा दुकानाची जबाबदारी ते सांभाळत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या काळात कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसल्याने कुटुंबाने मुंबई सोडण्याचा निर्णय घेत थेट नाशिक गाठले.
नाशिकमध्ये हलविला मुक्काम
अचानक आलेल्या आर्थिक संकटातून सावरताना नाशिकमध्ये संपूर्ण कुटुंब स्थलांतरित झाले. एकत्र कुटुंबाला पुढे नेताना नऊ सदस्यांचा पसारा मोठा होता. काही काळ सातपूरच्या जगतापवाडी येथे वास्तव्य केल्यावर नवीन नाशिकच्या भोळे मंगल कार्यालय परिसरात भाड्याने घेतलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मुक्काम हलविला. पती जयमल्हार कंपनीत हंगामी नोकरीत रुजू झाले.
मात्र, तुटपुंज्या पगारावर परवडत नसल्याने शोभाताई यांनी सासूबाईंबरोबर भाजीविक्री करण्याचा निर्णय घेतला. याच काळात कुटुंबात मुले आकाश व सागर यांच्यानिमित्त सदस्य संख्या वाढली. तपासे कुटुंबाला आधार म्हणून शोभाताई यांनी अश्विननगर परिसरात रोज सकाळी गल्लोगल्ली जाऊन भाजीविक्री करीत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला.
भाजीविक्री करीत असताना शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले. नवीन नाशिक येथील शुभम पार्क परिसरात जुने शिलाई मशिन घेत शिवणकाम सुरू केले. ब्लाउज शिवत असतानाच बारदाणापासून पाल तयार करण्याचे काम सुरू केले. यातून मिळणारा मोबदला चांगला असल्याने नाशिकसह तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही त्यांच्याकडे बारदाणपासून पाल तयार करण्यासाठी कामे मिळत गेली.
कुटुंबासाठी अनेक व्यवसाय
बारदाण शिवण्याच्या कामाबरोबरच परिसराची गरज ओळखून पतीच्या मदतीने लॉन्ड्री व्यवसायालाही शोभाताई यांनी सुरवात केली. या व्यवसायाची जबाबदारी पतीकडे सोपवत परिसरात शोभाताई स्वयंपाक करण्याच्या कामासाठी जाऊ लागल्या. या कामातील सर्व बारकावे लक्षात घेऊन स्ययंपाकासाठी मंगल कार्यालयांना मनुष्यबळ पुरवायला सुरवात केली.
सोबतच परिसरातील गरज ओळखून शोभाताईंनी स्वतःच स्वयंपाकाची कामे घेण्यास सुरवात केली. पहिल्याच दिवशी सिडको परिसरातील दशक्रिया विधी कार्यक्रमाच्या जेवणाची ऑर्डर घेत घेतलेला निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
यशाचा वाढता आलेख
केटरिंग व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक आधार देतानाच मुलांच्या शिक्षणाकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. मुलगा आकाश सध्या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यावर सी.ए.चे शिक्षण घेतोय; तर सागरने वाणिज्य विभागात पदवीचे शिक्षण पूर्ण करीत जिम्नॅस्टिकमध्ये प्रशिक्षक म्हणूनही सेवा देतो.
आयुष्यात आलेल्या प्रसंगांना सामोरे जाताना अनेक अडचणींना सामोऱ्या जाणाऱ्या शोभाताई यांनी जिद्दीच्या जोरावर केटरिंग व्यवसायातून केवळ कुटुंबालाच स्थिरस्थावर न करता चाकरमान्यांच्या वस्तीतील सुमारे ४० कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय.
खचून जाऊ नका
आयुष्यात येणारे दिवस नक्कीच बदलतात, या सकारात्मक विचारांवर कष्टाला प्रामाणिकपणाची जोड देणाऱ्या शोभाताई यांच्या आयुष्यात सुरेखा गायकवाड, विमलताई आढाव, चंद्रकांत तपासे, लता तपासे, अमोल दशपुते यांच्यासह केदारे तसेच तपासे कुटुंबाने दिलेल्या पाठबळामुळेच केटरिंग व्यवसायात उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख उभी करू शकली, हे सांगताना मात्र अनेकदा शोभाताई यांचे डोळे पाणावले होते.
नाशिक शहरासह परिसरातील गावांमध्ये शोभाताई यांनी केटरिंग व्यवसायात उभी केलेली ओळख नक्कीच महिलांसाठी प्रेरणादायी ठरलीय. आयुष्यात येणाऱया प्रसंगांमध्ये खचून न जाता संयमाने सामोरे गेले तर परिस्थिती नक्कीच बदलते, असा संदेशही खचून जाणाऱ्या मनांना द्यायला शोभाताई विसरल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.