Inspirational Story : जन्मतःच आलेल्या ठेंगणेपणाचा कसलाही कमीपणा मनात आणला नाही. उंची कमी असली, तरी देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याचा सकारात्मक विचार करत ती जणू स्वतःमधील जिद्दीतून उभी राहिली. कुटुंबाच्या मदतीने नोकरीच्या मागे न लागता आपल्यातील हुशारीचा तिने स्वतःमधील उद्योजिका उभी करण्यासाठी उपयोग करून घेतला. व्यंगासंदर्भातील सहानुभूतीचा आधार न घेता थेट जिद्दीच्या जोरावर अडचणींपासून पळ काढणाऱ्या समाजघटकांसाठी ‘आयडॉल’ ठरल्या, त्या नाशिकच्या त्रिमूर्ती चौकातील (सिडको) उच्चशिक्षित पूजाताई घोडके-सोनार..। (inspirational story of pooja not bring to mind any weakness )
जन्मतःच कमी उंचीमुळे व्यंग नशिबी आलेल्या पूजा घोडके-सोनार यांचे शिक्षण एम. कॉम. पर्यंतचे... वडील रमेश यांचे पत्नी नीता, दोन मुली व एक मुलगा असे कुटुंब... पूजा कुटुंबातील ज्येष्ठ कन्या... आजोबा बाळकृष्ण घोडके स्वातंत्र्यसैनिक होते. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या पूजाच्या वडिलांनी सुमारे पंधरा वर्षे लॉटरी व्यवसायातून कुटुंबाला आधार देत प्रयत्न सुरू ठेवत तिघा मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.
वडिलांनी लॉटरी व्यवसायातील आव्हाने लक्षात घेऊन पापडविक्री व्यवसायाला सिडको परिसरात सुरवात केली. पूजाताई यांनी एम. कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातही प्रयत्न सुरू ठेवले. शिक्षणासोबतच वडिलांच्या पापड व्यवसायातही त्यांनी लक्ष घालायला सुरवात केली. तीन फूट उंची असल्यामुळे समाज काय म्हणेल? याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवली.
कुटुंबाने दिली उभारी
रमेश घोडके यांना पूजाताईंनी घेतलेल्या जबाबदारीमुळे मोठा आधार मिळाला. २००९ पासून सुरू झालेल्या पापड व्यवसायात अनेक चढ-उतार आले, मात्र त्यात संयमाने परिस्थिती हाताळत वाटचाल सुरू ठेवली. प्रारंभी अन्य ठिकाणाहून पापड आणून घोडके कुटुंब त्याची विक्री करत होते. पूजाताईंनी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता याच व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
यातूनच त्यांनी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन मशिनरी खरेदी करत व्यवसाय वाढविण्यास सुरवात केली. स्टूलवर उभ्या राहून त्या उत्पादनाकडे लक्ष देत होत्या. प्रारंभी दिवसाकाठी पाच किलो पापड विक्री करणाऱ्या पूजाताईंनी आपल्या व्यवसायाला यशस्वी उद्योगाकडे नेले.
करोना काळातील संयम
करोनाकाळात पूजाताईंना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या काळात उत्पादन बंद असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना आपल्याकडे असलेल्या सेटअपमधून एक मशिन विकावी लागली. मात्र त्यांनी बाजारपेठेतील स्वतःची ओळख जपून ठेवण्याबरोबरच बँकेची परतफेड करण्याकडे लक्ष दिले.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीत योगदान
पापड व्यवसायाला भक्कमपणे पुढे नेत असतानाच या व्यवसायाच्या माध्यमातून चाकरमान्यांच्या वस्तीतील गरजू दहा कुटुंबांसाठी त्यांनी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. स्वतःमध्ये असलेल्या व्यंगाचा आयुष्यात कुठेही बाऊ न करता सकारात्मक विचारांचा पाठलाग पूजाताई यांनी केला. व्यवसायासोबतच समाजाचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून पथनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजऋण फेडण्यासाठी आपले योगदान सुरूच ठेवलंय. आजपर्यंत सामाजिक संदेश देणाऱ्या सुमारे पाचशे पथनाट्यांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. याशिवाय, वेगवेगळ्या नाटकांमध्येही अभिनय करत स्वतःचं वेगळेपण जपलं आहे.
खचून जाऊ नका
उच्चशिक्षित असूनही आयुष्यातील व्यंगावर मात करतानाच स्वतःला व्यवसायात झोकून देताना अडचणी मांडत प्रयत्न न करणाऱ्या समाजघटकांसाठी पूजाताई आयडॉल ठरल्या आहेत. परिस्थिती बसून राहत नाही. मात्र प्रयत्न कमी पडू देऊ नका... येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला संधी उपलब्ध करून देत असतो, असा संदेश बोलण्यातून देणाऱ्या पूजाताई यांना यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे जाताना घोडके-सोनार परिवार, आई-वडील, भाऊ करण यांच्यासह बहीण पायल यांच्या विसपुते परिवारासह सी. ए. अजित बोरसे यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.