Inspirational Story : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुनीताताई बनल्या उद्योजिका!

कुटुंबासमोर असलेल्या परिस्थितीवर मात करतानाच बास्केट कारागीर ते थेट डिजेच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून ओळख उभी केली आहे ती ओझरच्या सुनीताताई ठोंबरे यांनी.
Sunitatai thombare
Sunitatai thombareesakal
Updated on

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या खटल्याच्या कुटुंबात शिक्षणही अर्ध्यावरच सुटलं...परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता वाट्याला आलेल्या परिस्थितीलाच आव्हान... पतीचंही शिक्षण जेमतेम असल्याने बांधकामावर सुपरवायझर म्हणून काम करत होते.

कुटुंबासाठी आधार मिळावा, यासाठी हाताने तयार केलेल्या प्लॅस्टिक बास्केट तयार करून घरोघरी विक्री...यातून उभ्या राहिलेल्या भांडवलासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत पतीसाठी काळीपिवळी वाहन खरेदी केले.

कुटुंबासमोर असलेल्या परिस्थितीवर मात करतानाच बास्केट कारागीर ते थेट डिजेच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून ओळख उभी केली आहे ती ओझरच्या सुनीताताई ठोंबरे यांनी. (Inspirational Story Sunitatai became entrepreneur after overcoming adversity nashik)

चांदवड तालुक्यातील शिरसाणे येथील माहेर तर भोयेगाव येथील सासर असलेल्या सुनीताताई अशोक ठोंबरे. शिक्षण जेमतेम नववी पास. अभ्यासात हुशार असूनही शेतकरी कुटुंबातील जबाबदाऱ्यामुळे नववीतच शिक्षण सुटलं...

वडील कारभारी केदू देशमुख यांचे पत्नी हौसाबाई यांच्यासह चार मुले, चार मुली असं मोठं कुटुंब...चांदवड तालुक्यातील कुटुंबाला मिळणारा रोजगार हंगामी, त्यामुळे शेतीशिवाय पर्यायच नव्हता. देशमुख कुटुंबात सुनीताताई या सर्वात शेवटच्या कन्या.

शाळेत असतानाच शेतीतील कामांचीही जबाबदारी सदस्यांसह त्यांच्यावरही होतीच. देशमुख परिवाराचा सदस्य होताना कुटुंबाला मदत करताना सुनीताताई शिक्षणापासून लांब गेल्या. त्यातच सुनीताताई यांचा विवाह तालुक्यातीलच भोयेगाव येथील अशोक ठोंबरे यांच्याशी झाला.

पती अशोक यांचंही शिक्षण जेमतेम दहावीपर्यंतच... ठोंबरे कुटुंबाचाही उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. दुष्काळी परिस्थितीमुळे अशोक ठोंबरे यांनी नातेवाइकांच्या मदतीने नाशिक गाठले.

नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक बाळकृष्ण शिंदे यांनी अशोक यांना बांधकामावर सुपरवायझर म्हणून जबाबदारी दिली. शिंदे यांची सुनीताताई यांच्या कुटुंबाला मोलाची मदत झाली.

बिऱ्हाड हलवले ओझरला

पतीच्या तुटपुंज्या पगारावर कुटुंबाला पुढे नेताना पती अशोक यांची होणारी कसरत त्या बघत होत्या. त्यातच कुटुंबात मुलगा अविनाश याच्यासह दोन मुलींची भर पडली. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सुनीताताई बास्केट विणायला शिकल्या.

हाताने विणलेल्या बास्केट तयार करून ओझर परिसरात त्या विक्री करू लागल्या. एक बास्केट तयार करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागत होते. पती अशोक यांना काळीपिवळी वाहनातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने सुनीताताईंनी बास्केट विक्रीतून आर्थिक आधार उभा करण्यात यशस्वी ठरल्या.

कुटुंबाला आधार देण्याबरोबरच मुलांनाही उच्चशिक्षित केले. याच काळात मुलींची लग्न झाल्यानंतर मुलाकडेही विशेष लक्ष पुरवतानाच डीजेची सिस्टीम खरेदी करण्याचा निर्णय सुनीताताई यांनी घेतला.

यासाठी त्यांना बँकांचीही मदत घ्यावी लागली. याच काळात मुलगी अविनाश नाशिकला शिक्षण घेत होता. या व्यवसायात प्रारंभी आर्थिक फटका बसला तरी त्यांनी जिद्द सोडली नाही.

Sunitatai thombare
Inspiring Story : पतीच्या निधनानंतर संघर्षातून मुलाला दाखविला यशाचा महामार्ग

डिजे व्यवसायातून बनल्या उद्योजिका

पती चालक म्हणून स्वतःच्या काळीपिवळी टॅक्सीची जबाबदारी सांभाळत असतानाच सुनीताताई यांनी डिजे व्यवसायाच्या माध्यमातून दहा कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय.

डिजेच्या व्यवसायाला पुढे नेताना सुनीताताईंनी मुलासाठी ओझर शहरात फ्लेक्स प्रिंटीगचा व्यवसाय सुरू करून देत ठोंबरे कुटुंबाची ओळख उभी केलीय.

सून प्रियंका यांच्यासाठी किराणा दुकान सुरू करून देतानाच परिसरातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

खचून जावू नका

आयुष्यात आलेल्या परिस्थितीत महिलांनी खचून न जाता जिद्दीने परिस्थितीला सामोरे गेल्यास नक्कीच वाट सापडते, या सकारात्मक विचारांना पुढे नेणाऱ्या सुनीताताई यांच्या कुटुंबाला ओझरचे उद्योजक बाळकृष्ण शिंदे, पती अशोक, जावई, मुलगा अविनाश, मुली रोहिणी पाटील, धनश्री जाधव, सून प्रियंका यांच्यासोबतच देशमुख तसेच ठोंबरे कुटुंबाने वेळोवेळी दिलेल्या आधारामुळेच स्वतःला सिद्ध करू शकली, हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

Sunitatai thombare
Inspirational News: संकटांवर मात करत सरलाताईंनी मिळवली खाकी वर्दी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.