Indutai Wagh : राज्यातील पहिली महिला कुली बनल्या प्रवाशांसाठी आधार

सारी दुनिया का बोझ हम उठाते है...!
Indutai Wagh
Indutai Waghsakal
Updated on

लग्नाला अवघे वर्षही झालेले नसताना पती जग सोडून निघून गेला...पोटातील तीन महिन्यांच्या बाळानं जगही बघितलेलं नव्हतं... नियती कितीही निष्ठूर असली तरी आपल्या बाळासाठी जगायचंच... त्याला वाढवायचंच... या जिद्दीने स्वतः उभे राहत थेट नियतीलाच आव्हान देणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला कुली इंदूताई वाघ (चाडेगाव, ता.नाशिक) यांचा संघर्ष प्रेरणादायी असाच आहे...

- विजयकुमार इंगळे, नाशिक

सारी दुनिया का बोझ हम उठाते है... लोग आते है... लोग जाते है... या अमिताभ बच्चन यांच्या कुली चित्रपटातील गीताच्या निमित्ताने रेल्वे स्टेशनवरील कुलींचं आयुष्य अधोरेखित झालं. मात्र कुली म्हणून आयुष्य जगताना महिलाही या क्षेत्रात मागे नाहीत.

कष्टाची कामे करत आलेल्या संकटांना आत्मविश्वासातून परतवून लावत नाशिक रोड रेल्वे स्थानकात कुली म्हणून कष्टाची कामे करतानाच या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलीय ती चाडेगावच्या इंदूताई वाघ यांनी! महिलांपासून दूर असलेल्या हमाली कामाचा कसलाही कमीपणा न मानता या क्षेत्रात ओळख उभी केलेल्या इंदूताई वाघ यांचे शिक्षण जेमतेम सातवी पासपर्यंत झाले.

माहेर चाडेगाव येथील तर सासर शिवडी (ता. सिन्नर) येथील... वडील पांडुरंग कचरू मानकर यांचे पत्नी गीताबाई यांच्यासह खटल्याचे कुटुंब...शेतकरी कुटुंबाला पुढे नेताना अल्पशा कुटुंबाची गुजराण करणे शक्य नसताना संपूर्ण कुटुंबच शेतमजूर म्हणून काम करत होते. नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या चाडेगाव येथे पांडुरंग मानकर यांनी कुली म्हणून कामाला सुरवात केली. कुटुंबातील सात मुलींची जबाबदारी पुढे नेताना भविष्यातील अडचणी कमी करत इंदूताई यांचेही लवकर लग्न झाले.

नियतीनं कुंकू हिरावले

सासरी शिवडी येथे पती एकनाथ वाघ यांचीही परिस्थिती जेमतेम. शेतमजूर कुटुंबाचा गाडा पुढे नेत सुखी संसाराची स्वप्ने बघितलेल्या इंदूताई यांच्या नशिबी मोठे दुःख नियतीनं दिलं. भविष्यातील सुखाची स्वप्नं बघत असतानाच लग्नाला अवघ्या दहा महिन्यांचा कालावधी झालेला असतानाच एका दुर्घटनेत नियतीनं पतीचं छत्र हिरावून नेलं, तेव्हा इंदूताई तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. पण पतीने दिलेली ओळख भक्कम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

राज्यातील पहिल्या महिला कुली

कुटुंबाचा गाडा पुढे नेणाऱ्या वडील पांडुरंग मानकर यांचे या काळात छत्र हरपल्याने मात्र पुन्हा दुःखाची वाट समोर आली. मात्र आई गीताबाई, मुलगा सूरज यांच्यासह कुटुंबातील सदस्यांसाठी इंदूताई यांनी दिलेला आधार मोलाचा होता. मात्र या काळात इंदूताई यांचे घुगे परिवारातील चारही मामांनी कुटुंबासाठी उभी केलेली आधाराची फळी भक्कम होती.

आयुष्यात कष्टाला न घाबरता वडिलांच्या जागी कुली म्हणून रेल्वे विभागाकडून मान्यता मिळवत नाशिक रोड रेल्वे स्थानकात त्या कुली म्हणून कष्टाची कामे करत आहेत. पहिल्याच दिवशी कुली म्हणून कामाला सुरवात करताना दोनशे रुपयांची कमाई करत हमाल म्हणून स्वतःला यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

अनेक जण आस्थेवाईकपणे चौकशी करतात, तेव्हा तीच आपल्या कामाची कमाई असल्याचे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. कुली म्हणून कष्टाचे काम जरी असले तरी नोकऱ्यांमधील स्पर्धा बघता मुलगा सुरजनेही कुली म्हणून प्रवाशांची सेवा करावी, अशी प्रामाणिक इच्छा इंदूताईंनी व्यक्त केली.

माणुसकी जिवंत आहे...

कुली म्हणून काम करताना, त्यातच महिला कुली म्हणून रेल्वे स्टेशनवर त्यांचा वावर अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत असताना अनेक महिला प्रवाशांना त्यांच्याबद्दल आदर असतो. कुली म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रवाशांकडून मिळणारी वागणूक पाहून अनेकदा गहिवरून येते, असे त्या अभिमानाने सांगतात. संपूर्ण भारतातील प्रवासी नाशिकमध्ये ये -जा करतात, मात्र माणुसकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणे इंदूताई यांच्या कुली म्हणून कामात घडत गेली.

रेल्वे स्थानकात महिला कुली म्हणून काम करणे तसे अवघड आणि अशक्यच. मात्र जगण्याची वाट जर भक्कम करायची असेल तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसल्याचे त्या नेहमीच सांगतात. अनेकदा रेल्वे स्थानकाची माहिती नसलेल्या, गावाकडून वाट चुकलेल्या महिला तसेच प्रवाशांना आधार देताना, योग्य मार्गदर्शन करताना समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधान नक्कीच मिळत असल्याचे इंदूताई अभिमानाने सांगतात.

नियतालाच दिले आव्हान...

कुटुंबप्रमुखाचं अकाली जाणे म्हणजे मोठा आघात होता...पण जगाचं तोंडही न पाहिलेल्या नवजात बाळासाठी त्यांनी स्वतःला सावरलं... जगण्यासाठी आधार म्हणून याच काळात गावातच शिवणकाम शिकल्याने काही प्रमाणात का होईना, इंदूताईंना आर्थिक आधार मिळाला. शिवणकामातून रोजगार शोधत इंदूताई यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. याच काळात कुटुंबात मुलगा सूरजच्या येण्याने त्या आनंदी होत्या. सुरजसाठी आणि आई-वडिलांना आधार देण्यासाठी इंदूताई या स्वतःच कुटुंबप्रमुख बनल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.