किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : देशाची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले असताना महाराष्ट्राने त्यापैकी २० टक्के उद्दिष्ट स्वीकारले आहे.
यात नाशिकचा पाच टक्के वाटा राहणार असल्याने जिल्ह्याच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात अर्थात, ‘जीडीपी’मध्ये वाढ करण्यासाठी दीड लाख कोटीची गुंतवणूक आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने त्याचा पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. (Investment of one half lakh crore needed to increase GDP of Nashik Sports Figures in Five Year Plan of District Administration Nashik)
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पंचवार्षिक आराखड्यानुसार जिल्ह्याच्या ‘जीडीपी’त २.३९ लाख कोटी रुपयांची वाढ करण्यासाठी जवळपास दीड लाख कोटीची गुंतवणूक करावी लागेल.
आपल्या जिल्ह्यातील गुंतवणुकीचा इतिहास बघितला, तर काही वर्षांत अकरा हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झालेली नाही. यातही रिलायन्स कंपनीने तब्बल दहा हजार कोटींचा प्रकल्प साकारला, तर कृषीप्रक्रिया उद्योगांमध्ये पाचशे ते हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे.
आता दीड लाख कोटीची गुंतवणूक कशी होणार, उद्योग उभारणीसाठी प्रशासनाने मिळवलेल्या आकड्यांना आधार कशाचाही नसल्याचे दिसून येते. आकडे सादर करताना हवेत तीर मारल्याचे दिसून येते.
एवढी मोठी गुंतवणूक एकट्या नाशिक जिल्ह्यात कशी होणार, याबाबत या कृती कार्यक्रमात काहीही नमूद नसले, तरी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठमोठ्या आकड्यांचे दाखवलेले मृगजळ प्रत्यक्षात कसे अवतरणार, असा प्रश्न आहे.
सव्वादोन लाख कोटींनी ‘जीडीपी’ वाढवण्यासाठी दीड लाख कोटीची गुंतवणूक करावी लागते का, असा प्रश्न या आराखड्यातून निर्माण झाला आहे. पंचवार्षिक आराखड्यात २०२८ पर्यंत नाशिक जिल्ह्याचा ‘जीडीपी’ ३.९२ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जिल्हा प्रशासनाने कृषी निर्यात, कृषी प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, उत्सव, माहिती व तंत्रज्ञान, प्रदर्शन, नाशिकचे ब्रॅन्डिंग, करमणूक उद्योग, आयुष मंत्रालयाच्या यादीत समाविष्ट होणे आदींच्या माध्यमातून वार्षिक १६.९६ टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवून हा आराखडा तयार केला आहे.
या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक अपेक्षित
पुढील पाच वर्षांत कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, संरक्षण साहित्य उत्पादन, फार्मा क्लस्टर, प्लास्टिक क्लस्टर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, माहिती तंत्रज्ञान पार्क, पर्यटन, जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारे मार्ग, फिल्म स्टुडिओ, वाहनउद्योग क्षेत्र व मेडिकल टुरिझम यांच्या माध्यमातून जवळपास दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते, असे गृहित धरण्यात आले आहे.
समितीमध्ये अर्थ विभागाचा अधिकारीच नाही
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास व कृती कार्यक्रम तयार करण्यात आला.
यात मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, पर्यटन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी आदींसह सह्याद्री फार्मचे अध्यक्ष, मी नाशिककर संस्थेचे अध्यक्ष, ‘निमा’चे अध्यक्ष आदींच्या सहभागातून कृती कार्यक्रम तयार केला आहे. परंतु, यात अर्थ विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.