सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. वावी-शहा रस्त्यावरील खळवाडी परिसरात ही पाईपलाईन अक्षरशा उघड्यावर आली आहे. पाईप जमिनीखाली तीन फूट गाडले असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आल्याने एकूणच या कामाबद्दल संशय व्यक्त होत आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून व वावी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी सुधारित जलवाहिनी टाकण्याचे काम जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येत आहे.
यात मुख्य गावात लोखंडी (जीआय) पाईपलाईन प्रस्तावित असून उर्वरित गावठाणात एचडीपीई पाईपलाईन टाकण्याचे काम संगमनेर येथील मे. जिजाराम राजाराम फड या कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरू आहे. या पाईपलाईनसाठी सुमारे सव्वादोन कोटी रुपये शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. (Jal Jeevan mission work contractor work not proper Case in vavi Three feet buried pipeline exposed Nashik News )
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली हे काम करण्यात येत आहे. वावी येथील खळवाडी भागात सदर जलवाहिनीच्या कामात ठेकेदाराकडून चुका झाल्याचे स्थानिक रहिवाशांकडून वारंवार सांगण्यात येत होते याला पुष्टी देणारा प्रकार नुकताच समोर आला आहे .
जलवाहिनी टाकण्याचे काम करताना अंदाजपत्रकानुसार तीन ते साडेतीन फूट जमिनीखाली जलवाहिनी टाकणे आवश्यक होते. मात्र अवघे फूटभर खोदकाम करून ठेकेदाराने पाईप गाडले. हाताने माती उकली तरी हे पाईप उघडे पडत असल्याचा हा धक्कादायक प्रकार असून ठेकेदाराचा देखरेख करणारा सुपरवायझर मात्र आम्ही तीन फूट खोदकाम करून पाईप काढले होते हे पाईप वर कसे आले हा प्रश्न आम्हालाही पडला असे सांगत होता.
काही ठिकाणी मुरूम व कठीण खडक लागल्याने तेथे खोदकाम अपेक्षित खोली इतके झाले नाही अशी कबुली देखील या सुपरवायझरने दिली . अर्थात एकूणच हा प्रकार हास्यास्पद आणि संतापजनक आहे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अशा प्रकारे खर्च होणार असेल तर भविष्यात या कामाचा फायदा काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान या प्रकाराबाबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अरुण पाटील, शाखा अभियंता मयूर बिब्बे यांच्याशी संपर्क साधत सदर कामाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार श्री. पाटील व श्री. बिब्बे यांनी स्वतः वावी येथील खळवाडी भागात भेट देऊन पाईप उघड्यावर असलेल्या ठिकाणी पाहणी केली.
यावेळी ठेकेदाराचा सुपरवायझर देखील त्यांच्यासोबत होता. सदरचा प्रकार चुकीचा असून आम्ही ठेकेदाराचे समर्थन करणार नाही असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. जलवाहिनी टाकण्याचे गावातील काम तातडीने थांबवावे व ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित खोली घेतली गेली नाही तेथे ब्रेकरच्या सहाय्याने योग्य खोदकाम करून नव्याने जलवहिनी टाकावी अशी सूचना श्री. पाटील यांनी दिली.
"वावी गावातील खळवाडी सोबतच गायत्री नगर, कर्पे मळा या भागात देखील जलवहिनी उघड्यावरच आहे. अवघे एक ते दीड फूट खोदकाम करून ठेकेदार मनमानी करणार असेल तर नुकसान गावाचे होईल. ग्रामपंचायतने या कामावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे होत आहेत. या कामांची देखील योग्य पडताळणी होणे आवश्यक आहे. म्हणजे योजनेचा उद्देश साध्य होईल."
- गणेश वेलजाळी, ग्रामस्थ
"वावी गावातील जलवहिनीच्या कामावर यापुढील काळात पाणीपुरवठा विभागाकडून देखरेख करण्यात येईल. ठेकेदाराला सूचना करून चुकीचे काम तातडीने दुरुस्त करायला सांगितले आहे. जेसीबी नव्हे तर पोकलेंड मशीन वापरून खडक, मुरूम असलेल्या भागात खोदकाम करावे अशी सूचना केली आहे."
- अरुण पाटील, उपअभियंता - जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग
"ग्रामपंचायत मार्फत ठेकेदारास मंजूर आराखड्याप्रमाणे काम करण्यास सांगितलेले आहे. जलवाहिनी कुठून कोणत्या भागात टाकायची याबाबत सूचना करण्यात आली आहे. खोदकामात ठेकेदाराकडून चुका झाल्या असतील तर ही बाब अयोग्य आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टेस्टिंग घेतल्याशिवाय जलवाहिनी ग्रामपंचायत ताब्यात घेणार नाही."
- विजय काटे, माजी सरपंच (वावी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.