Jalna Lathi Charge : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.
त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातही पोलिस सतर्क झाले आहेत. संवेदनशील ठिकाणी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियातूनही घटनेचा निषेध होत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर संदेश व्हायरल होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जात आहे.
जालना येथे मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेमुळे राज्यभर मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त होतो आहे.
त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मराठा समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर-जिल्हा पोलिस सतर्क झाले आहेत.
नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानक, ठक्कर बझार बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिक रोड बसस्थानक, निमाणी बसस्थानक, नाशिक रोड रेल्वेस्थानक याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीही पोलिस तैनात करण्यात आले. शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा सज्ज असून, गर्दीची ठिकाणे असलेल्या बाजारपेठा, मार्केट परिसरातही पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह आठ सहाय्यक आयुक्त, ८० पोलिस निरीक्षक-सहाय्यक निरीक्षकांसह सुमारे ७५० पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय, राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, शीघ्र कृती दल, दंगाविरोधी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गुन्हे शाखांच्या पथकांसह पोलिस ठाणेनिहाय पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढविण्यात आलेली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्यातही सतर्कता
जिल्ह्यातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून शहराप्रमाणेच जिल्ह्यातही ग्रामीण पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण व मालेगाव परिसरात पोलिस ठाण्यांसह अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
जिल्ह्यातील संवेदनशील शहरे, गावांमध्ये जादा कुमक पाठविण्यात आलेली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांसह शीघ्र कृती दल व दंगाविरोधी पथकांनाही सज्जतेचे आदेश देण्यात आले.
आयुक्तालयातील फौजफाटा
आयुक्त - १
उपायुक्त - ४
सहाय्यक आयुक्त - ८
पोलिस निरीक्षक/सहाय्यक निरीक्षक - ८०
उपनिरीक्षक व कर्मचारी - ७५०
शहर गुन्हे शाखा/ वाहतूक पोलिस
शीघ्र कृती दल, दंगाविरोधी पथक, राखीव पोलिस दलाच्या तुकड्या
सोशल मीडियावर ‘वॉच’
आंदोलनाच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरूनही संदेश व्हायरल होत आहेत. याच माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य वा संदेश प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहर सायबर सेल सतर्कता बाळगून आहे. सायबर सेलकडून सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या, व्हायरल होणाऱ्या संदेशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. चिथावणीखोर संदेश आढळून आल्यास तत्काळ संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्या आहेत.
"शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. दिवस-रात्र पोलिस पेट्रोलिंग वाढविण्यात आली. सोशल मीडियावरही सायबर सेलकडून करडी नजर आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह वा चिथावणीखोर वक्तव्य-संदेश व्हायरल करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.