Nashik News : मांडवड गावाचे भूमिपुत्र व लष्करात सेवा बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या जवान संदीप मोहिते यांच्या पार्थिवावर आज हजारोंच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लष्कराच्या १०५ बटालियनच्या सेवेत कार्यरत असणारे हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते (३२) यांना दोन दिवसापूर्वी लेह लडाख भागात सेवेत असताना वीरगती प्राप्त झाली होती. (Jawan Sandeep Mohit bids farewell in mandwad nashik news)
त्यांचे पार्थिव रात्री पुण्यात आणल्यानंतर आज सकाळी लष्कराच्या विशेष वाहनाने त्यांच्या मूळगावी मांडवडला आले, तेव्हा कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. पत्नी मनीषा, आई-वडील, भाऊ व लहान मुलांचे आक्रंदन काळीज हेलावून टाकणारे होते. गावातून आज सकाळी फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या विशेष वाहनाने पार्थिव गावाच्या प्रमुख मार्गाने शाकंबरी नदीकिनारी आणण्यात आले. गावातल्या घर अंगणात रांगोळ्यांचा सडा टाकून शहीद संदीप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
‘भारत माता की जय, वीर जवान संदीप अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. संदीपच्या आई प्रमिलाबाई व पत्नी मनीषा, मुले देवराज व दक्ष, वडील भाऊसाहेब, भाऊ शिवाजी, श्रीकांत यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. अखेरचा निरोप देताना जिल्हा परिषद शाळा मांडवड व स्वर्गीय शरदअण्णा आहेर जनता विद्यालय मांडवडचे असंख्य विद्यार्थी तरुणांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन आदरांजली वाहिली.
राज्य शासनातर्फे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडत मानवंदना दिली. लष्करातील सुभेदार एस.आर. पाडले, हवालदार दीपक सोमवंशी, हवालदार रवींद्र निकम, कमांडिंग ऑफिसर कर्नल खत्री, कंपनी कमांडर जॅकसन जोश, मेजर चेतन बगुले, नाईक सुभेदार विनायक माने आदींच्या पथकाने आपल्या सहकाऱ्याला अखेरची मानवंदना दिली.
माजी आमदार अँड जगन्नाथ धात्रक, अँड. अनिल आहेर, संजय पवार, मविप्रचे संचालक अमित पाटील, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अँड. जयश्रीताई दौंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, विजय पाटील, विनोद शेलार, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, साईनाथ गिडगे, राजाभाऊ बनकर, राजाभाऊ पवार, चेतन पाटील, बाबा बच्छाव, सजन कवडे, समाधान पाटील, गणेश शिंदे, विठ्ठल आहेर, व्यंकट आहेर, विशाल वडघुले यांच्यासह विविध राजकीय सामाजिक पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहीद संदीप मोहिते यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वळवी, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर चेतन वाघे, माजी सैनिक संघटनेचे दिनकर आहेर, बाजीराव मोहिते, नानासाहेब काकळीज, शिवाजीराव डोळे यांनीही पुष्पचक्र अर्पण केले.
स्मारकासाठी सर्वोतपरी सहकार्य ः कांदे
गावकऱ्यांनी लोकनेते शरद आहेर जनता माध्यमिक विद्यालयाच्या आवारात वीरजवान संदीप मोहिते यांचे स्मारक उभारणार असल्याचे जाहीर केले. हा धागा पकडत आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघातर्फे श्रद्धांजली वाहताना शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची, देशासाठी केलेल्या कर्तव्याची सर्वांना जाणीव असेल, त्यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळेल असे उचित स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.