घोटी, इगतपुरी (जि. नाशिक) : मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील अग्नितांडवातील धुराचे लोट आणि आग आज मंगळवारी तिसऱ्या दिवशीही मुंबई-आग्रा महामार्गावरून नजरेतून सुटत नव्हती. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी भेट देत दुर्घटनेचा मागोवा घेतला. तसेच प्रशासनाला योग्य माहिती देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला व्यवस्थापनाला दिल्याची माहिती उपलब्ध झाली. (Jindal fire Accident District Collector visited Jindal and tracked down 724 Worker Safety Claim one missing nashik news)
कंपनी व्यवस्थापनाने प्रशासनास दुर्घटनेवेळी पहिल्या ‘शिफ्ट’ मध्ये ७४९ कामगार वेगवेगळ्या प्लँटमध्ये उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये १५ ठेकेदार कामकाज पाहत असून सर्व कामगार सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधला गेल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातील १९ कामगार जखमी झाले असून दोन महिला कामगारांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.
आणखी एक सुधीर मिश्रा नामक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, रात्री आठपर्यंत दुर्घटनेच्या प्लँटमधील कामगारांना कंपनी व्यवस्थापकाकडून हजर करण्यात आले नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर अनेक कामगार हे बाहेर गेल्याने जबाब मोजक्या कामगारांचे घेणे सुरु होते.
कामगार हे दुर्घटनेच्या दिवशी कॉलनीत होतो असे सांगत आहेत. त्यामुळे घटनेचा तिढा गडद होऊन पोलिसांची डोकेदुःखीत भर पडणार असे दिसते. पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे, फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
दुर्घटना झालेल्या इमारतीची आग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसत होते. आजूबाजूला रात्री उशिरापर्यंत आगीचे लोळ उठत असल्याचे दिसत होते. रासायनिक उग्र दुर्गंधीयुक्त धूर पसरत होता. विभागीय पोलिस अधीक्षक डॉ.अर्जुन भोसले, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर हे माहिती संकलित करत आहेत.
बैठकीचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन
कामगारांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची मागणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली. तसेच इतर कंपन्यांविषयीच्या तक्रारींचा पाढा श्री. खोसकर यांनी वाचला. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत लवकर बैठक घेण्याचे आश्वासन श्री. खाडे यांनी श्री. खोसकर यांना दिले.
आणखी ४ दिवस लागण्याची शक्यता
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ९ बंद, ४० जवान, एन. डी. आर. एफ. चे ४५, तर एस. डी. आर. एफ. चे ४५ जवान तैनात कऱण्यात आले आहेत. ही आग आटोक्यात येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल, असे काही अधिकाऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
मात्र आज एन. डी. आर. एफ. च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आणखी चार दिवसांचा कालावधी आग पूर्णतः आटोक्यात आणण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली आहे. स्फोट आणि आगीसह धुराचे लोळ, जखमी व मृत कामगार या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
जिंदाल कंपनीत झालेली आगीची घटना दुर्दैवी असून दुर्घटनेत जखमी झालेल्या व मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
"तसेच मुंढेगाव हे गाव कंपनीपासून हाकेच्या अंतरावर आहे. आग लागल्याने त्यातून निघालेल्या रासायनिक वायूमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने योग्य व आवश्यक ती खबरदारी घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात."- मंगल गतीर, सरपंच, मुंढेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.