Nashik News : राज्यात विजेचे संकट गडद होत असताना अवघ्या दोन संचांचे मनुष्यबळ असताना संच सुरू करण्यात आले. परंतु, रिक्त जागा भरण्यात याव्यात, यासाठी संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. यासंदर्भात शनिवारी (ता. २) झालेल्या द्वारसभेत विविध निर्णय घेण्यात आले.
नाशिक औष्णिक वीज केंद्रात सद्यस्थितीत तीन संच स्थापित आहेत. तिन्ही संचांच्या संचलनाकरिता आवश्यक असलेली कर्मचारी संख्या सध्या वीज केंद्रात उपलब्ध नाही.
या अगोदर अपुरे मनुष्यबळ असतानाही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व कर्मचाऱ्यांनी व संघटनांनी तिन्ही संच सुरू ठेवण्याकरिता पूर्ण सहकार्य केले आहे. (Joint Action Committee has agitation for Vacancies should be filled in thermal power station nashik news)
प्रशासनाबरोबर वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये कर्मचारी संख्या पूर्तता व रद्द करण्यात आलेली ९७ पदे पूर्ववत करण्याबाबत प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आले. परंतु, अजूनही त्याबाबत ठोस अशी कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. या सर्व बाबींमुळे संचलन विभागात कार्यरत असलेले अभियंते, कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून तीन/चार सायकल रोट्यानुसार काम करीत आहेत.
अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे व अत्यावश्यक सेवेमुळे कर्मचाऱ्यांना १६ ते २४ तास काम करावे लागत आहे. सततच्या कामाच्या ताणामुळे तसेच कामाच्या ठिकाणात होत असलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडत आहे. सद्यस्थितीत बरीच कामाची ठिकाणे विनाकर्मचारी आहेत. यामुळे वीज केंद्रातील यंत्रांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. काही संयंत्रांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे दिसते.
अशा परिस्थितीत काम करीत असताना अपघात व अनुचित घटना घडून मनुष्य, वित्त व यंत्रांची हानी होण्याची भीती आहे. नाशिक येथील संच क्रमांक पाचमधील मंजूर ९७ पदे रद्द केल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत अडचणी निर्माण होत आहेत व दुसरीकडे उपलब्ध दोन संचांच्या मनुष्यबळात तीन संच चालविण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत संयुक्त कृती समितीने याअगोदरही प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे. तरीही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सर्व घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होत असून, प्रशासनाविरोधात आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा प्रकारे प्रशासनाने हेकेखोरपणे एकतर्फी निर्णय घेऊन तिन्ही संच चालविण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध क्रमबद्ध पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व कोणत्याही वेळेला संप पुकारण्यात येईल.
या सर्व घटनांमुळे काही अघटित घटना, अपघात अथवा औद्योगिक शांतता भंग झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. संदर्भ क्रमांक सहानुसार निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक तत्काळ रद्द करण्यात यावे व कर्मचारी उपलब्धतेबाबत मुख्य कार्यालय पातळीवर योग्य ती जलद कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त कृती समितीने केली आहे.
दृष्टिक्षेपात
- संच पाच कागदोपत्री बंद
- सद्यस्थितीत ९७ जागा रद्द
- मंजूर जागा : १०६४
- संच तीन
- उपलब्ध मनुष्यबळ : ६८०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.