नाशिकच्या साहित्य संमेलनाला ठाले-पाटलांनी ठोकले

Marathi sahitya sammelan
Marathi sahitya sammelanesakal
Updated on

नाशिक : लोकांच्या सहाय्याने, लोकवर्गणीतून, अधिक लोकांना सोबत घेऊन साधेपणाने नाशिकमधील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) होईल, असा विचार आम्ही करत होतो. पण फासे उलटे पडले. शब्द देणारे शब्दांना जागणारे निघाले नाहीत. त्यातील काही पक्के व्यावसायिक, तर काही हिशेबी निघाले. पंचतारांकित साहित्य संमेलनाच्या नादात साहित्य महामंडळाच्या हेतू व धोरणाचा बळी दिला. नाशिकमध्ये ठरलेले साहित्य संमेलन शहराबाहेर नेले. रसिकांच्या प्रवासाची व्यवस्था केली. मात्र शहरातील सामान्य माणसे संमेलनापासून वंचित राहिली, अशा शब्दांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील (Kautikrao Thale-Patil) यांनी नाशिकच्या संमेलनाला ठोकले.

लेखक, नेते, सरकारसह रसिक निशाण्यावर

मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘अक्षरयात्रा’चा तिसरा अंक प्रसिद्ध झालाय. त्यात श्री. ठाले-पाटील यांनी लेखक, नेते, सरकारसह मायबाप रसिकांना निशाण्यावर ठेवले. सरकारच्या परवानगीने सरकारच्या पैशातून संमेलन घेणाऱ्यांना दगदग करावी लागत नाही. त्यामुळे संमेलन लोकांचे होण्याऐवजी सरकारचे होईल. कालांतराने हे सरकारच्या लक्षात येईल, तेव्हा सरकारच साहित्य संमेलन ताब्यात घेईल आणि सरकारच्या कच्छपी असलेल्या लेखकांना व राजकीय नेत्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या तथाकथित रसिकांना हाताशी धरून साहित्य संमेलनाचा हा महाउत्सव कदाचित साजरा करतील. हा धोका साहित्य संस्था व वाङ्‍मयीन जगत जितक्या लवकर ओळखेल तितके चांगले, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलीय.

Marathi sahitya sammelan
नाशिक : वारली पेंटींगद्वारे चिमुकल्यांनी रंगविल्या घरांच्या भिंती

जातेगावकरांनी फिरवला शब्द

लोकांच्या सहभागाने आटोपशीर संमेलन घेता येईल, असे सुचविले. आम्हाला संमेलनात राजकीय नेत्यांचे वावडे नाही, ते आमचे शत्रू नाहीत, पण व्यासपीठावर त्यांचा वावर नसावा, असे ठामपणे सांगितले होते. आमच्या अटी मोकळ्यापणाने मान्य केल्या. मात्र कोरोनामुळे लोकांची आर्थिक क्षमता खालावलेली असल्याने स्वागताध्यक्षापुरती एका नेत्याची मुभा आम्हाला मिळावी, त्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याला आम्ही व्यासपीठाचा वापर करू देणार नाही, असे आश्‍वासन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिले. मात्र संमेलन मिळताच, त्यांनी यथावकाश शब्द फिरविला. ते शब्दाला जागले नाहीत. आमची फसवणूक झाली. हे जेव्हा आमच्या लक्षात आले तोपर्यंत फार उशीर झाला होता, असेही श्री. ठाले-पाटील यांचे म्हणणे आहे.


तिघांनी आपले उद्देश केले पूर्ण

संमेलनाविषयीच्या आमच्या सूचना अव्हेरल्या. आमची रचना मोडीत काढली, असे सांगत असताना श्री. ठाले-पाटील यांनी नाशिकच्या प्रतिष्ठित आणि सभ्य व्यक्तीचे नाव उघड न करता तिघांनी आपले उद्देश पूर्ण केले, असे टीकास्त्र सोडले. साहित्य महामंडळाचे कुंकू त्यांना हवे होते. ते त्यांनी त्यांच्या सोयीसाठी वापरून घेतले. ती त्यांची प्रत्येकाची गरज होती, असे स्पष्ट करत असताना श्री. ठाले-पाटील यांनी संमेलनाचा कोण कसा ‘खेळ’ करते हे पाहत बसण्यापलीकडे काहीही उरले नाही, असे नमूद केले. शिवाय संमेलनाध्यक्ष ‘खेळ’ करू शकतात, अशी खंत मांडली. संमेलनाला येणार नसल्याचे आपणाला कळविण्याचे सौजन्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी दाखविले नाही. संमेलन संपल्यावर स्वागत मंडळाने त्यांच्या घरी जाऊन केलेला सत्कार त्यांनी स्वीकारला. ही आमच्यासाठी त्यांनी केलेली मोठीच गोष्ट म्हटली पाहिजे, अशी श्री. ठाले-पाटील यांची भावना झाली आहे..

Marathi sahitya sammelan
नाशिक : सामाजिक आरोग्‍यासाठी एकत्र यावे; राज्यपाल कोश्‍यारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.