नरकोळ (जि. नाशिक) : प्रत्येक महिलेला आई होऊन आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा देऊन त्यांचे संगोपन करून स्वतः बरोबरच बाळांना व कुटुंबाला एक आनंदाच्या महासागरात न्हाऊन नेण्याची जबाबदारी पेलावी लागते. बाळाला जन्म दिल्यानंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहणे हा परमेश्वराचा आशिर्वादच असतो आणि तो आशिर्वादरूपी प्रसाद कुटुंबाला फलदायी ठरतो.
मात्र, जुळ्या अथवा तिळ्यांना जन्म देणाऱ्या आईला मोठ्या अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागते. अशीच ह्रदयद्रावक घटना बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे घडली. जन्माला आलेले तिळे तब्बल ७१ दिवस सटाणा येथील सिम्स यशोधन रुग्णालयाने यशस्वीरीत्या वैद्यकीय उपचार देऊन संगोपन केले. रूग्णालयातून सुट्टी देताना डॉक्टरांसह कर्मच्याऱ्यांचे डोळे पाणावले.
केरसाणे येथील पूजा राजेंद्र माळी या आईने तिळ्यांना जन्म दिला. त्यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार जन्मानंतर बाळाचे वजन किमान दोन ते अडीच किलो असायला पाहिजे तेव्हा त्या बाळाची वाढ व वजन जन्मानंतर पुढील काळात अधिक वाढते. मात्र, पूजा यांनी जन्माला घातलेल्या तीनपैकी दोन बाळांचे वजन ९०० ग्रॅम, तर तिसऱ्याचे वजन एक किलो होते.
बाळांची प्रकृती बघता पूजाने जन्म दिलेल्या बाळांना दवाखान्यातील डॉक्टरांनी तातडीने बालरोग तज्ज्ञांचे मागदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बाळांचे वडील राजेंद्र माळी यांनी सिम्स यशोधन रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. तिन्ही बाळांना सिम्स यशोधनमध्ये आणल्यानंतर डॉ. प्रकाश जगताप, डॉ. संदेश निकम, डॉ. तुषार वाघ, डॉ. इंद्रजित बाहेकर, डॉ. डी. एम. सोनवणे, डॉ. ऋषी देवरे, डॉ. दिनेश गुंजाळ, भूषण सोनवणे, राहुल तारू, मिलिंद पवार यांनी तीन बाळांच्या शारीरिक वैद्यकीय तपासणी करून आई- वडीलांसह कुटुंबियांना धीर दिला आणि लागलीच उपचारांना सुरवात केली.
२५ ऑगस्ट रोजी तीन बाळांवर सिम्स यशोधन रुग्णालयात उपचार सुरू झाले. येथील डॉक्टरांच्या टिमने बारकाईने अभ्यास करून एका विचाराने वैद्यकीय उपचारांची दिशा ठरवत तीन बाळांना ऑक्सिजनच्या काचेच्या पेटीत ठेवले आणि संथगतीने उपचारांना प्रारंभ केला. बाळांनी देखील उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे डॉक्टरांच्या टिमचे मनोधैर्य वाढले. रुग्णालयातील नर्स व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील बालक समजून त्यांचा सांभाळ केला.
पूजा माळी हिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने सिम्स यशोधन रूग्णालयातील डॉक्टरांनी या तिघा बालकांवर उच्च दर्जाच्या महागड्या औषधांचा वापर करण्यात आला. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अवलंब करीत तब्बल ७१ दिवस यशस्वी मोफत उपचाराअंती तिळे सुदृढ असून, त्यांना रूग्णालयातून घरच्या वातावरणात नेण्याचा निर्णय सिम्स यशोधन प्रशासनाने घेतल्याने कुटुंबीय आनंदी झाले.
"सिम्स यशोधन प्रशासनाने शासनाच्या योजनेतून मोफत उपचार पद्धती अवलंबल्यामुळे आम्हाला खर्च आला नाही. रुग्णालयात चांगली सेवा मिळाली. आनंदी आहोत."
- राजेंद्र माळी, बाळाचे वडील, केरसाणे
"तिन्ही बाळांना दवाखान्यातून घरी पाठवताना रुग्णालयाच्या आवारात रांगोळी व फुलांची सजावट करून बाळांची जन्मदाती आई पूजा, वडील राजेंद्र यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला." - डॉ. संदेश निकम, यशोधन रुग्णालय, सटाणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.