Labor Election : मजूर फेडरेशनसाठी तिरंगी, बहुरंगी लढती; 7 तालुका प्रतिनिधी बिनविरोध

election news
election news sakal
Updated on

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (ता. २४) अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मालेगाव, कळवण, सटाणा, दिंडोरी व नांदगाव या सात तालुका प्रतिनिधी गटात एकच अर्ज शिल्लक राहिल्याने या तालुका संचालकांची बिनविरोध निवड झाली. सिन्नर, निफाड, देवळा, चांदवड, नाशिक, पेठ, सुरगाणा, येवला तालुका प्रतिनिधीसाठी एकापेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्याने दुरंगी, तिरंगी लढत होणार आहे.

जिल्हास्तरावरील पाच राखीव जागांसाठी बहुरंगी लढती होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २५) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Labor Federation 7 taluka representatives unopposed contest in 8th taluka multi contest for five seats at district level nashiik news)

जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी यंदा कधी नव्हे, एवढी मोठी गर्दी झाली. तब्बल १६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यासाठी १० ते २४ नोव्हेंबर माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. गुरुवारी माघारीचा अंतिम दिवस असल्याने गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वरमधून संपत सकाळे, इगतपुरीतून ज्ञानेश्वर लहाने, मालेगावमधून राजेंद्र भोसले, कळवणमधून रोहित पगार यांचा यापूर्वीच बिनविरोध निवडीचा मार्ग खुला झाला आहे.

गुरुवारी सटाणा तालुक्यातील दाखल केलेल्या चारपैकी तिघांनी माघार घेतल्याने शिवाजी रौंदळ यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. दिंडोरीतून बबन जाधव व बबनराव आंबाड यांनी माघार घेतल्याने प्रमोद मुळाणे याचा अर्ज शिल्लक आहे. नांदगावमधून अनुजा आहेर, रघुनाथ वावधाने, हरेश्वर सुर्वे, उषा जेजुरे यांनी माघार घेतली. प्रमोद भाबड यांचा अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. निफाडमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचे पुतणे अमोल थोरे व सुनील सोनवणे यांचा अर्ज शिल्लक राहिल्याने येथे सरळ लढत होणार आहे. पेठ तालुका संचालक पदासाठी मनोज धूम, भगवान पाडवी व सुरेश भोळे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

सुरगाणा तालुका संचालक पदासाठी आनंदा चौधरी व राजेंद्र गावित यांच्यात लढत होणार आहे. नाशिक तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक योगेश हिरे, शर्मिला कुशारे, उत्तम बोराडे, मिलिंद रसाळ निवडणूक रिंगणात आहेत. देवळा तालुका संचालक पदासाठी सतीश सोमवंशी, सुभाष गायकवाड व सुनील देवरे रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. जिल्हास्तरावरील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. महिलांसाठी राखीव दोन जागांकरिता चार उमेदवार रिंगणात आहेत. यात अनिता भामरे, आशा चव्हाण, कविता शिंदे, दीप्ती पाटील यांचा समावेश आहे. ओबीसींसाठी राखीव एका जागासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी असलेल्या एका जागेसाठी आठ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

election news
Nashik News : कचऱ्यातील प्लॅस्टिकमुळे गाईंचे आरोग्य धोक्यात!

सिन्नरमध्ये कोकाटे विरुद्ध कोकाटे सामना

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक दिनकर उगले पुन्हा रिंगणात उतरले आहेत. येथे आमदार कोकाटे यांचे लहान बंधू भारत कोकाटे यांनीही निवडणुकीत आपला अर्ज ठेवल्याने उगले आणि कोकाटे यांच्या सरळ लढत होणार आहे. या गटातून तीन-तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे. उगले विरुद्ध कोकाटे, अशी लढत होत असली तरी, खरा सामना कोकोटे विरुद्ध कोकाटे असाच रंगणार आहे.

येवल्यात भुजबळ विरुद्ध दराडे

येवला तालुका संचालकपदासाठी विद्यमान संचालक संभाजी पवार यांनी माघार घेतली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थक सविता धनवटे आणि आमदार किशोर दराडे व नरेंद्र दराडे यांच्या समर्थक मंदा बोडके रिंगणात असून, येथे दुरंगी लढत होणार आहे. भुजबळ यांनी मध्यस्थी करत इतर उमेदवारांच्या माघारी घेतल्या. मात्र दराडेसमर्थक बोडके यांनी अर्ज ठेवत भुजबळ यांना आवाहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

चिठ्ठी निघूनही माघारीची नामुष्की

चांदवड तालुका संचालक पदाची निवडणूक ही माघारीच्या दिवशी चांगलीच गाजली. ही जागा बिनविरोध व्हावी, यासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. यामध्ये म्हसू कापसे यांची चिठ्ठी निघाली. त्यानुसार कापसे यांना बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून देत इतरांनी माघारी घेण्याचा निर्णय चिठ्ठी टाकण्यापूर्वी झाला होता. मात्र चिठ्ठी निघाल्यानंतर शरद आहेर यांनी उमेदवारी अर्ज माघार देण्यास नकार देत थेट काढता पाय घेतला. त्यामुळे विद्यमान संचालक शिवाजी कासव यांनीही उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

यात चिठ्ठीने कौल देऊनदेखील कापसे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे आहेर विरुद्ध कासव यांच्यामध्ये पारंपरिक लढत होणार आहे. बिनविरोध निवडीसाठी माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी हजेरी लावत प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

election news
Headphones Side Effects: सावधान...! ‘Headphones' वापराताय?; तिशीत येतेय बहिरेपण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.