नाशिक : आधार कार्डावरून आता घरबसल्या वाहनाचे शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेमुळे ही सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांच्या नोंदणीची प्रणाली वितरकांच्या स्तरावर ऑनलाइन होणार आहे. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. ही सुविधा पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. (Learning-licenses-will-be-available-at-home-nashik-marathi-news)
लर्निंग लायसन्स मिळेल घरबसल्या
नागरिकांच्या वेळेत बचत करण्यासह ऑनलाइन सुविधांचा लाभ देण्याबाबत निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्राद्वारे माहिती दिली. पत्रात म्हटले आहे, की केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सूचना केंद्राने वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. या सेवांमध्ये प्रामुख्याने घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देणे व वाहन वितरकांच्या स्तरावर वाहन क्रमांक जारी करणे यांचा समावेश आहे.
अशी असेल लायसन्सची प्रक्रिया
घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) चाचणीचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ‘परिवहन’ या संकेतस्थळावर आधार क्रमांकाची नोंद करावी. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी, आधार डेटा बेसमधून ‘परिवहन’ या संकेतस्थळावर येईल. यामुळे अर्जदाराची ओळख व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्यकता नसेल. नंतर अर्जदार रस्ता सुरक्षाविषयक व्हिडिओ पाहून घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देतील. विचारलेल्या प्रश्नांचे ६० टक्के अचूक उत्तर दिल्यास चाचणी उत्तीर्ण ठरविले जातील. अशा अर्जदारांना घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट प्राप्त होईल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, ज्या अर्जदारांकडे आधार क्रमांक नाही किंवा या सुविधेचा लाभ घ्यायचा नाही, अशा अर्जदारांना पूर्वीप्रमाणे ‘परिवहन’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज व आवश्यक प्रक्रिया राबवून स्लॉट बुकिंग करता येईल.
वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइनच
वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरांमार्फत ऑनलाइन देण्याची सुविधा विकसित केली आहे. याद्वारे अर्जदाराची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करत प्रमाणपत्र अपलोड केले जाईल. यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी परिवहन संकेतस्थळामार्फत अर्ज करायचे असून, त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी घ्यायचे आहेत.
दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकांच्या स्तरावर
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार दुचाकी व कार या नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीसाठी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत यापुढे वाहन तपासणीची आवश्यकता नसेल. आकर्षक क्रमांकाचे बुकिंग केलेल्यांसाठी वेगळी प्रक्रिया असेल. वाहन अधिकृत विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक आपोआप जारी होणार आहे. वाहन वितरक सर्व कागदपत्रे डिजिटल सिग्नेचरचा वापर करून ई-स्वाक्षरी करणार असून, नोंदणीसाठी आता वाहन किंवा कागदपत्रे परिवहन कार्यालयात सादर करण्याची आवश्यकता नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.