नामपूर (जि. नाशिक) : येथील सटाणा दोद्धेश्वर रस्त्यालगत असणाऱ्या शेतशिवारात, घाट परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतात घर करून राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचीही भीती
परिसरातील नागरिकांचा शेती मुख्य व्यवसाय असल्याने येथील अनेक शेतकरी शेतात घर करून राहतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्धपालन, गोट फार्म असे अनेक व्यवसाय सुरू केले आहे. परंतु बिबट्याने पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निताणे येथील ज्येष्ठ शिक्षकनेते युवराज पवार, नामपूर शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप देवरे, संचालक दादा कापडणीस आदी शुक्रवारी (ता. १८) प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी पनवेलला जात असताना पहाटेच्या वेळी दोद्धेश्वरच्या घाटात भर रस्त्यावर पूर्ण वाढ झालेला भारदस्त बिबट्याला प्रत्यक्षदर्शी पाहिल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
शेतात राहणाऱ्यांनी सुतळी बॉम्ब फोडावे
सटाणा येथून कोटबेल, जायखेडा, गोराणे, निताणे, आनंदपूर, बिजोटे, आखतवाडे आदी गावांना जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणून अनेक नागरिक दोद्धेश्वर रस्त्याला पहिली पसंती देतात. अनेक दुचाकीस्वार रात्रीच्या वेळी सुद्धा धोकादायक प्रवास करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सटाणा येथील वन विभागाच्या अधिकारी, वनकर्मचारी यांनी बिबट्याचा वावर असणाऱ्या शेतशिवारास भेट देऊन पाहणी करून तातडीने पिंजरा बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. काही स्थानिक नागरिकांना शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडणे, सुतळी बॉम्ब फोडणे, मोठ्या आवाजात गाणे वाजवणे असा सल्ला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतात राहणाऱ्या नागरिकांना दिला आहे. दिवसा वावर असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीच्या कामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
''दोद्धेश्वर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार आहे. बिबटय़ाने यापूर्वी अनेकदा परिसरातील गावांमधील पाळीव जनावरे, पाळीव कुत्री फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्याने दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा बसवावा. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक भयभीत आहेत.'' - युवराज पवार, ज्येष्ठ शिक्षकनेते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.