मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : मालेगाव व सटाणा तालुक्यातील सीमावर्ती भागात मोसम नदीच्या खोऱ्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनावर (Livestock) बिबट्याने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात दोन महिन्यात २७ पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. वीज भारनियमनामुळे कांदा व तत्सम पिकांना रात्रीचा पाणीपुरवठा करावा लागत असल्याने बिबट्याच्या प्रचंड दहशतीने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. वन विभागाने (Forest Department) बिबट्या जेरबंद करण्यासाठी दोन महिन्यात कारवाईच केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगाव तालुक्यातील कोठरे, सातमाने, अजंग, वडेल, काष्टी, डाबली, दुंधे, तळवाडे, टिपे, मोरदर, विराणे, पोहाणे, कजवाडे तसेच, सटाणा तालुक्यातील अंबासन पंचक्रोशीत बिबट्याने (Leopard) प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बागायती शेती (Horticulture) केली जाते. सध्या डाळींब या फळबागांसह कांद्याचे पीक जगवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतमळ्यात राहणारे शेतकरी व मजूर उन्हाळ्यात उघड्यावर अथवा स्लॅबवर झोपण्यास पसंती देतात. यामुळे पाळीव प्राणी सुरक्षाविरहीत राहतात. ज्या शेतकऱ्यांकडे कांदाचाळ आहे त्यांनी त्या चाळीत रात्रीच्या वेळी पाळीव प्राणी बांधत आहेत. अद्याप कांदा चाळीत येणे बाकी असल्याने कांदाचाळ हा सुरक्षेचा नवा मार्ग गवसला आहे. मात्र, असा तोडगा फार कमी शेतकऱ्यांना गवसला आहे. सुरक्षित व बंदिस्त गोठा बांधणे शक्य नाही. रात्री भारनियमनामुळे पिकांना जलसिंचन करावे लागते. अशावेळी बिबट्याची दहशत आणि पिक जगवण्याची धडपड यातून शेतकरी हवालदील झाला आहे.
बिबट्या जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी
बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल हे भक्ष्य ठरले आहे. या भागात बिबट्याचा रात्रीच्या वेळी मुक्तसंचार असल्याने शेतकरी व शेतमजूर रात्र जागवून काढत आहेत. दिवसा उन्हाची काहिली आणि रात्री बिबट्याचा हैदोस यामुळे या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. दोन महिन्यापासून बिबट्याने ठिकठिकाणी हल्ले केले. मृत पाळीव प्राण्यांचे पशु वैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले. या पशुधनाला मुकावे लागूनही शासनाकडून मदत तर मिळालीच नाही, वन विभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी कोणतेच पाऊल उचललेले नाही. यामुळे आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी काटवन भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या भागात कोल्हे, लांडगे व तीन ते चार बिबटे असल्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी हिंस्त्र पशुंपासून संरक्षण करणाऱ्या उपलब्ध साधनांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
"नागरीकांनी रात्रीच्या वेळी शेकोटी, अंगावर घोंगडी, बॅटरी, मशाल, काठी ही साधने सोबत बाळगावी. एकट्याने रात्रीचा वावर टाळावा. पशुधन जखमी झाल्यास पशुवैद्यकीय विभागास संपर्क करावा."
- डॉ. जावेद खाटीक, पशुधन विकास अधिकारी, मालेगाव
"मोसम खोऱ्यात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. रात्रीच्या वेळी भारनियमनामुळे पिकांना पाणी द्यावे लागते. एकीकडे पीक जगवण्याचे आव्हान तर दुसरीकडे बिबट्या हल्ला करेल की काय, याची दहशत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर घाबरले आहेत. वन विभाग माणसांचा बळी गेल्यावरच जागा होणार आहे का?"
- शेखर पवार, कार्यकर्ते, शेतकरी संघटना, पिंपळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.