नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज स्विकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
व्हिजन डॉक्यूमेंटद्वारे करणार कामकाज
लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारतांना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे, यासाठी विद्यापीठाचा व्हिजन डॉक्यूमेंट तयार करुन कामकाज करणार आहे. यामुळे अल्प, मध्यम अणि दिर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-19 च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. आणि त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कामकाज उल्लेखनीय
विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की, प्रभारी कुलगुरुपदाच्या कारकीर्दीत या दरम्यान आरोग्य शिक्षणाच्या विविध प्रशासकीय बाबींचा अभ्यास करता आला. विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठीचे काम, विविध बैठका, चर्चासत्र व उपक्रम यात सहभाग, परीक्षा कालावधीत कोविड-19 च्या परिस्थितीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा उल्लेख महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर आहे तसेच कमी मनुष्यबळ असतांना चोख होणारे कामकाज उल्लेखनीय आहे. आरोग्य शिक्षणाची जागतिक भरारी विद्यापीठाने घेतली असून नवनियुक्त मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठाच्या कार्याला नवी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगीतले की, विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचे विद्यापीठ परिवाराच्या वतीने स्वागत करतो. मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे प्रशासकीय कामकाजात मार्गदर्शन लाभले. त्यांचा विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचा अनुभव नेहमीच प्रेरणा देईल. शैक्षणिक व संशोधन कार्यात विद्यापीठ नावलौकिक मिळवत आहे. विद्यापीठाचा जागतिक स्तरावर दर्जा उंचावण्यासाठी कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त संशोधन व समाजाभिमुख उपक्रम राबवू असे त्यांनी सांगितले.
कुलगुरु पदाच्या निवडीकरीता शासनाकडून शोध समिती गठीत करण्यात आली होती. विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळर यांच्याकडे होता. कुलपती कार्यालयाकडून आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु पदासाठी लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
याप्रसंगी लेफ्ट. जनरल (निवृत्त) डॉ. राजीव कानिटकर, डॉ. पद्मजा कानिटकर, वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. सुरेश गोसावी, कर्नल अनिमेश, डॉ. श्रीकांत देशमुख, श्री. गौर्ण आदी मान्यवरांसह उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, उदयसिंह रावराने, डॉ. नितीन कावेडे, डॉ. संजय नेरकर, महेंद्र कोठावदे, संदिप कुलकर्णी, डॉ. संदिप गुंडरे, गितांजली लोमटे, डॉ. प्रदिप आवळे, चित्रा नेेतारे, डॉ. आर. टी. आहेर, अनंत सोनवणे, प्रकाश पाटील, मिलींद देशमुख, योगिता पाटील, शिल्पा पवार, संदिप राठोड, महेश बीरारी, राजेंद्र नाकवे, डॉ. सचिन गायकवाड व विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.