Mahavitaran News : सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना ‘महावितरण’कडून उपलब्ध झाली आहे.
त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली ‘महावितरण’शी जोडण्यात आली असून, जुनी मालमत्ता घेताना दस्तनोंदणीपूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार पुढील प्रक्रिया ‘महावितरण’कडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे. (Mahavitaran new option for property buyers Automatically change name of connection nashik)
‘महावितरण’ आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलात नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरू केली आहे.
यापूर्वी वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती; पण आता दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
दस्तावेज अपलोडची गरज नाही
एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्तावेज अपलोड करण्याची गरज नाही.
एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची, त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल.
याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘महावितरण’कडून ‘एसएमएस’द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे.
तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यावर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही, तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांनी सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.
६० दिवसांत ‘एसएमएस’
स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होऊन ६० दिवसांत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येते.
याबरोबरच प्रक्रिया शुल्काचे इनव्हाईस ‘महावितरण’च्या अधिकृत संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.
थकबाकी तपासून घ्या!
पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार ‘महावितरण’ला असल्याचा न्यायालयाचा निकाल असल्याने जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी खरेदीदाराची वीजबिल थकबाकी तपासून घेण्याचे आवाहन ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.