येवला (जि. नाशिक) : ब्रिटिशकालीन, दुष्काळी अवर्षणप्रवण आणि राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत वरच्या स्थानी असलेल्या येवल्यात शेतकऱ्यांना वरदान ठरतो तो खरीप हंगाम! (Kharif Season) मात्र हा हंगामही पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. तथापि येथील शेतकरी जिगरबाज आणि प्रयोगशील असल्याने खरिपातच वर्षाची उत्पन्नाची तयारी ठेवतात. त्यानुषंगाने पीक पॅटर्नदेखील बदलता असतो. बाजारात सोयाबीन, मका, तसेच कपाशीच्या भावात तेजी असल्याने यंदा या तीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. शिवाय लाल कांदा (Red Onion) आमच्या हक्काचा म्हणत दरवर्षीप्रमाणे कांद्याचे क्षेत्रही वाढतेच राहणार आहे. (Maize soybean sowing objective on 74000 hectares Nashik Agricultural News)
तालुक्याचे जून ते ऑक्टोबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ५१२ मिलिमीटर आहे. इतका पाऊस झाला तर खरिपाची शाश्वती नक्कीच असते, अर्थात मागील दोन वर्ष सोडले तर त्यापूर्वी अल्प पावसामुळे खरीप देखील गोत्यात आला होता. मागील वर्षी ६५६ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे खरिपातील मका, कापूस, कांदे व इतर सर्वच पिके पाण्यात अक्षरशः सडली होती. या वेळी देखील नुकसान न करता चांगला पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असून, त्या दृष्टीने हंगामाची तयारी सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी शेतीची नांगरणी करून ठेवली असून, खरीप पूर्वमशागतीलाही सुरवात झाली आहे.
या अवर्षणप्रवण तालुक्यात मागील तीन-चार वर्षांत मकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यात नंबर एकवर येथे मका घेतली जाते. तत्पूर्वी कपाशीचे ते क्षेत्र होते. मात्र तीन ते चार वर्ष बेभरवशाची झाल्याने कपाशीचे क्षेत्र घटले होते. परंतु मागील वर्षी पांढऱ्या सोन्यासह सोयाबीनने भावाचा दहा हजारांचा टप्पा ओलांडल्याने या वर्षी कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार, हे नक्की! लाल कांद्याने गेले तीन वर्षे चांगली साथ दिल्याने यंदाही लागवडीचे क्षेत्र वाढीव राहील; पण आगाद कांद्यालाच भाव मिळत असल्याने मुगाचे क्षेत्र कमी करून यात कांदालागवड होऊ शकते. या बदलात कडधान्य, तेलबिया (Oil Seeds) व बाजरीच्या (bajra) क्षेत्रात यंदाही घट होऊ शकेल.
वेध लागले, लगबग सुरू
मॉन्सूनच्या बातम्या येऊन धडकल्या असून, वातावरणही बदलू लागल्याने शेतकऱ्यांना आता खरिपाची वेध लागले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी बी-बियाण्यांचे नियोजन व खते खरेदी करत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यास तालुक्यातील शेतकरी मका लागवड व इतर पेरण्यास सुरवात करतील. त्यादृष्टीने कृषी विभागानेदेखील तयारी चालविली. यंदाही चांगला पाऊस वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले आहे. चांगला हमीभाव व उत्पन्नाची हमी असल्याने तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर यंदादेखील मकाची लागवड होणार आहे. तालुका लाल व रब्बीतील रांगड्या कांद्याचे आगार असल्याने व या वर्षी देखील बाजारभाव समाधानकारक असल्याने या वर्षीदेखील कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. नगदी भाजीपाल्याकडे शेतकरी वळत आहेत. मागील वर्षी तालुक्यात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. मात्र सुरवातीला मिळणाऱ्या भावामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांनी रोपे बुक केली आहेत. मागील दोन-तीन वर्षी लाल कांद्याला तेजी राहिल्याने या वर्षी शेतकरी लाल कांदे लागवडीला प्राधान्य देणार असल्याचे दिसतेय.
पूर्वमशागत, पेरणीचे नियोजन
तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टरवर असून, यात वाढ होत ७३ हजारांच्या आसपास हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामावर शेतकऱ्यांची पुढील गणित अवलंबून असल्याने सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, शेणखत पसरविणे, तण गोळा करणे या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे. तालुक्यात मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद आदी पिकांची ७३ हजार हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक बीजप्रक्रिया, बीबीएफने पेरणी, १० टक्के रासायनिक खताची बचत करणे, जमीन आरोग्य पत्रिकाप्रमाणे खताचा वापर करणे आदी जनजागृती कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.
खतांचे नियोजन करावे!
येथील कृषी विभाग अप-डाउनच्या गर्तेत अडकला आहे. येण्या-जाण्यातच वेळ जात असल्याने कृषी विभागाची पूर्वीप्रमाणे मार्गदर्शन व उपक्रमशीलता दिसत नाही. त्यातच दरवर्षी रासायनिक खतांसाठी तक्रारी व आंदोलने होतात.त्या मुळे कृषी अधिकाऱ्यांनी खतांचे नियोजन करण्याची गरज आहे.
अशी होईल खरिपाची पेरणी पीक - सर्वसाधारण क्षेत्र - प्रस्तावित क्षेत्र ज्वारी - ३ - ०० बाजरी - ८९५५ - ८७३३ मका - १८६७४ - ३९१६९ तूर - ११९० - ४४२ मूग - २२९४ - ७१७८ उडीद - ७२४ - १९० भुईमूग - १६५१ - २६३३ सूर्यफूल - १२ - ०० तीळ - ८ - ०० सोयाबीन - ३४९२ - ६६८२ कापूस - १३१५१ - ८९०८ ऊस - ८०० --- ०० एकूण - ५०१७१ - ७३९३०
"दरवर्षीचा अनुभव पाहता तालुक्याला आवश्यक तेवढे बी-बियाणे व खते उपलब्ध करण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धावपळीची वेळ येणार नाही. शिवाय बियाण्यांत व खतात काळाबाजार होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. या संदर्भात आम्ही कृषी अधिकाऱ्यांना भेटून आत्ताच नियोजनाची मागणी करणार आहोत."
-हरिभाऊ महाजन, अध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.