Nashik News : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाली मध्ये अज्ञात टँकर चालकांकडून ज्वालाग्रही रसायने ओतली जात असल्याच्या घटना मागील अनेक महिन्यांपासून घडत आहेत.
या रसायनामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली असून शेती पिकांचे नुकसान होत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वावी पांगरी शिवेवर असलेल्या शिंदे वस्ती जवळ या ज्वालाग्रही रसायनाने पेट घेतला अतिशय भयानक प्रकारची ही आग असल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. (major fire broke out on Sinnar Shirdi highway Incident of pouring flammable chemicals on roadsides Nashik News)
रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वावी-पांगरी शिवेवर असलेल्या शिंदे वस्ती नजीकच्या नाल्याजवळ महामार्गावरील नालीमध्ये ओतलेल्या ऑइल सदृश्य केमिकलने पेट घेतला. वाऱ्यामुळे ही आग भडकली आणि धुराचे प्रचंड लोळ उठू लागले. यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील काही वेळ ठप्प झाली होती.
काळाकुट्ट धूर आणि त्यातून दिसणाऱ्या आगीच्या ज्वाला यामुळे एखादा ज्वालाग्रही इंधनाचा टँकर पलटी झाला की काय अशी शंका सर्वांना येत होती. अगडोंब इतका भयानक उसळला की मीठसागरे, वावी, पिंपरवाडी शिवारामध्ये सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे धूर येणार्या दिशेने अनेकांनी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर रस्त्याच्या कडेला टाकलेल्या ज्वालाग्रही केमिकल मुळे ही आग भडकल्याचे निष्पन्न झाले. शिर्डी मार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरमधून केमिकल ओतण्याचे प्रमाण अलीकडच्या काही महिन्यात वाढले आहे. खोपडी ते देवपूर फाटा दरम्यान रस्त्याच्या कडेच्या नालीमध्ये ऑइल मिश्रित रसायनाचा काळाकुट्ट थर साचलेला दिसतो.
पुढे पांगरी पर्यंत हीच परिस्थिती आहे. तर आता वावी येथील शर्वरी लॉन्स च्या विरुद्ध बाजूला वावीचे माजी ग्रामपंचायत सदस्य इलाहीबक्ष शेख यांच्या शेताजवळ देखील दोन दिवसांपूर्वीच केमिकलचा टँकर रिकामा करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला टँकर थांबवून केमिकल बाजूच्या नालीत सोडून देण्यात येते. प्रवाही असणारे हे केमिकल पूर्ण नालीत पसरते.
वाढता उष्मा आणि उन्हामुळे या केमिकलने पेट घेण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.शिर्डी महामार्गावरून सॉल्व्हंट सदृश्य ज्वालाग्रही रसायनाची सर्रास वाहतूक सुरू असते.
एका विशिष्ट ट्रान्सपोर्ट कंपनीचे हे टँकर असून ते रात्रीच्या वेळी प्रवास करतात. मुंबईकडे जाणारे हे टँकर रिकामे होऊन पुन्हा रात्रीच परतीच्या प्रवासाला येतात. परतताना वॉशआऊट करण्यासाठी टँकर पाणी टाकून आणले जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे प्रवासात टँकरची टाकी विसळून निघते व हेच रसायन मिश्रित पाणी रस्त्याच्या कडेला ओतून दिले जाते. काही वर्षांपूर्वी कसारा घाटात तसेच जव्हार घाटात अशाच पद्धतीने केमिकल ओतण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी केलेल्या कारवाईत पकडलेले टँकर अहमदनगर जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याच्या केमिकल बनवणाऱ्या कंपनीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते.
महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरची पोलिसांच्या गस्तीपथकांनी चौकशी करणे आवश्यक आहे. याच टँकर मधून घातक रसायने जमिनीवर ओतली जातात. त्यामुळे एखाद्या टँकर रस्त्याच्या कडेला उभा असेल तर तो का उभा आहे याची खात्री पोलिसांच्या गस्ती पथकांनी करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.