मालेगाव (जि. नाशिक) : रमजान पर्वातील उपवास (रोजे) अंतिम टप्प्यात आले आहेत. रमजान ईदसाठी (Ramzan Eid) बाजारपेठा सजल्या असल्या तरी येथील दोन लाखावर यंत्रमाग कामगार व इतर आस्थापनातील हजारो कामगारांना ईदच्या बोनसची प्रतिक्षा आहे. शुक्रवारपासून (ता. २९) ईदच्या बोनस वाटपाला सुरवात होणार आहे. यानंतर येथील बाजारपेठांना झळाळी मिळून खरेदीस ‘चारचॉंद’ लागतील. येथील किदवाई रस्त्यावरील चॉंदरातच्या खरेदीला यंदा विक्रमी उलाढाल (Record turnover) होण्याची शक्यता आहे.
यंत्रमागाचे माहेरघर असलेल्या मालेगावात दोन ते अडीच लाख यंत्रमाग आहेत. यावर लाखो कामगार काम करतात. शहराची अर्थव्यवस्थाच यंत्रमागाच्या खडखडाटावर अवलंबून आहे. वीज, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती यामुळे हा व्यवसाय देखील अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. दोन वर्षानंतर ईदचा सण उत्साहात होत असल्याने येथील बहुसंख्य यंत्रमाग मालकांनी महिन्यापासून कारखान्यातील उत्पादन सुरु ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये कामगारांची गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढविण्यात आले आहे. शहरात रमजान ईदला बोनस देण्याची प्रथा आहे. साधारणत: सणाला चार-पाच दिवस बाकी असताना बोनस वाटपास सुरवात होते.
शासनाच्या नियमानुसार कामगारांना ईदचा बोनस म्हणून २१ दिवसाच्या हक्क रजेऐवढा पगार देणे आवश्यक आहे. मात्र यंत्रमागाची परिस्थिती मालकांएवढीच कामगारही जाणून आहेत. येथील बहुसंख्य मालक व कामगारांमध्ये समन्वयाने बोनस वाटप केला जातो. यात कामाचा अनुभव, हुद्दा याचाही विचार केला जातो. साधारणत: तीन ते पाच हजार रुपयादरम्यान बहुसंख्य कामगारांना बोनस दिला जातो. यंत्रमागाशी निगडीत सर्वच कामगारांना कमी-अधिक प्रमाणात का होईना बोनसचे वाटप केले जाते. यात प्रामुख्याने यंत्रमाग मजूर, हमाल, बीम भरणारे, कपडा घडी करणारे, तरासन भरणारे, सायझिंगमध्ये काम करणारे मजूर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आठवड्याला पगार देण्याची पद्धत आहे. ईदचा सण जवळ आल्याने शुक्रवारच्या पगारासोबतच काही कामगारांना बोनस वाटप केला जाणार आहे.
यंत्रमागाबरोबरच शहरात प्लॅस्टिक पाईपचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. पाईप कारखान्यातील कामगारांनाही याच पध्दतीने बोनस मिळतो. शहरातील खासगी दुकाने, प्रतिष्ठाने आदींमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांनाही ईदची भेट हमखास दिली जाते. कितीही लहान व्यावसायिक असला तरी त्याच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना याचा लाभ मिळत असतो. चंद्रदर्शन झाल्यास ३ मेस ईद होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर २ मेस चॉंदरात राहील. २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत यंत्रमाग व पाईप कारखान्यातील कामगार तसेच खासगी आस्थापनावरील कामगार अशा एकूण तीन लाखावर मजुरांना ईदचा बोनस मिळणार आहे. यानंतर बाजारपेठांमध्ये लक्षणीय उलाढाल अपेक्षित आहे. सामान्य कुटुंबातील नागरीक चॉंदरातलाच ईदची खरेदी करतात. एकूणच आगामी आठवड्यात बोनस वाटपानंतर मालेगावात खरेदीची धूम पहायला मिळेल.
बोनसबरोबर मिळणार उचलही
येथे ईदच्या बोनसबरोबर उचल देण्याची प्रथा आहे. रमजान ईदसाठी कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. कामगार आगामी पगारापोटी कारखानदार व खासगी आस्थापना मालकाकडून उचल घेतात. सणानंतर समान हप्त्याने घेतलेली उचल परतफेड केली जाते. सणासाठी उचलची प्रथा असल्याने मालकही खुशीने कामगारांना देत असतात. आठवड्याचा पगार, ईदचा बोनस व सणासाठीची उचल यामुळे येथे ईदला विक्रमी आर्थिक उलाढाल होवू शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.