या जगामध्ये कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही कमी अधिक प्रमाणात कमतरता असते. पण त्यास दोष देण्यात देण्यापेक्षा जी परिस्थिती आहे ती स्वीकारावी. ज्ञान व शिक्षण प्राप्त करावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं करिअर घडवावे. नशिबाला दोष देण्यापेक्षा जिद्द व चिकाटीने यश मिळवावे. आपल्यातील ज्ञानाची दृष्टी कायम ठेवावी मत केंद्रीय विद्यालय आयएसपी नेहरूनगरचे प्राचार्य बाळासाहेब लोंढे यांनी व्यक्त केले. (manmokala sakal special interviewer nikhil rokade interview of Principal Balasaheb Londhe nashik)
- निखिलकुमार रोकडे
1) सुरवातीच्या शिक्षणाबद्दल सांगा
प्राचार्य बाळासाहेब लोंढे : मी मूळचा श्रीरामपूर येथील. जन्मानंतर दोन-तीन वर्षातचं माझी दृष्टी गेली. कालांतराने मलाही जाणीव झाली. सुरवातीचे शिक्षण अंधशाळेत झाले. इयत्ता आठवीमध्ये डोळस शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी मला प्रवेश नाकारला. त्यांचे असे म्हणणे होते की विद्यार्थी दहावी पास होईल का? त्यांचा प्रयत्न शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी होता.
पण मी त्यांना विचारले मग आतापर्यंत आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के का लागला नाही? शिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून मला प्रवेश मिळवून दिला. दहावीला मला ६८.७१ टक्के मिळाले. सर्वांची अपेक्षा होती की सायन्समध्ये शिकावे पण व्यवस्था नव्हती अकरावी बारावी आर्ट्स तेव्हाही मला फर्स्ट क्लास होता.
२) जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग सांगा
प्राचार्य लोंढे : माझी केंद्रीय राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांना भेटलो. माझी परिस्थिती बघून त्यांनी मला २५ हजार रुपये मदत देण्याचे कबूल केले. पण मी ती मदत नम्रपणे नाकारली व त्यांना म्हटलो की मला जर काही द्यायचे असेल तर नोकरी द्या. कारण मला पुढील शिक्षण करायचे आहे. बीए पूर्ण करत प्रवरा हॉस्पिटलमध्ये तीनशे रुपये प्रतिमहिना टेलिफोन ऑपरेटर ची नोकरी १९९० ला मिळाली.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
३) नोकरीतील प्रवास सांगा
प्राचार्य लोंढे : सुरवातीपासून माझे ध्येय हे शिक्षक बनायचे होते. नोकरी करत असताना मालेगाव येथून अपडाऊन करून मी बीएड एलएलबी पूर्ण केले. नॅबच्या जिल्हा शाखा श्रीरामपूर येथे अंधशाळेत शिक्षक या पदावर नोकरी केली.
२००६ ला स्पर्धा परीक्षा मधून केंद्रीय विद्यालयात पीजीटी व टीजीटी या दोन्ही पदांसाठी एकाच वेळी नियुक्ती झाली. आमला (मध्यप्रदेश), देवळाली-१, मुदखेड, नांदेड येथे प्राचार्यपदी पदोन्नती मिळाली.
सध्या केंद्रीय विद्यालय आयएसपी नेहरूनगर येथे प्राचार्य, पहिली ते बारावी सोळाशे विद्यार्थी, ३४ क्लास व ६० शिक्षक व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व शिक्षण जबाबदारी माझ्याकडे आहे. इंटरनेट, कॉम्प्युटर ऑपरेटिंग, एमएस ऑफिस, स्कॅनिंग, ड्राफ्टिंग, एडिटिंग याबद्दलचे कार्यालयीन ज्ञान मला अवगत आहे.
कॉम्प्युटर शिकतानाही मला प्रवेश नाकारला होता पण मी त्यांना सांगितले मला तुम्ही सुरवातीला फक्त सांगा कोणते ‘की’ बटन कुठे आहे मी प्रॅक्टिस करेल. काही दिवसातच मी योग्यरीत्या कॉम्प्युटर हाताळू लागलो.
४) अंध व अपंग यांच्या समस्यांबद्दल सांगा?
प्राचार्य लोंढे : बारावीपर्यंतचे पुस्तके ब्रेल लिपीमध्ये आहे. तसेच अभ्यासक्रम ऑडिओ फॉरमॅटमध्येही उपलब्ध आहे. शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणामध्ये निश्चित सुधारणा करणे आवश्यक आहे. ज्यांची दृष्टी कमी आहे.
पण डोळ्यांनी दिसते अशांना नोकरी मिळते. उदाहरणार्थ अपंगत्व कमी प्रमाणात अल्प असेल अपंगत्वाचे प्रमाणपत्र असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नोकरी मिळते. पण ज्याचे अपंगत्वाचे प्रमाण अधिक आहे, अशी व्यक्तीच नोकरीपासून वंचित राहते, ही शोकांतिका आहे.
५) आपल्या कुटुंबाबद्दल सांगा
प्राचार्य लोंढे : माझी पत्नी कविता एमए बीएड आहे. माझ्याबद्दल सर्व माहिती होती. स्वतः डोळस असूनही माझ्याबरोबर विवाह केला.
मुलगी स्मिता ही एमएस्सी केमिस्ट्री तर मुलगा यश इंजिनिअरिंग शिकत आहे. माझ्या सर्व वाटचालीमध्ये कुटुंब व मित्रपरिवार मार्गदर्शन व पाठबळ कायम मिळत आहे.
६) पालक व विद्यार्थ्यांसाठी संदेश.
प्राचार्य लोंढे : पालकांनी शालेय व्यवस्थापनावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी सुचविलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे. आपल्या पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सध्याच्या डिजिटल युगात सुविधा भरपूर आहे, त्याचा लाभ घ्यावा. स्वतःची शैक्षणिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग करावा. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.