Nashik News : जिल्ह्याच्या आदिवासी भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर सर्रास उपचार करत असून कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हे बोगस डॉक्टर आदिवासी, गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. (many fraud doctors are treating patients in tribal area nashik news)
एकट्या इगतपुरी तालुक्यात असे तेरा बोगस डॉक्टर असल्याची माहिती खुद्द आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. असे असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाही या डॉक्टरांबद्दल काहीही देणेघेणे नाही किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असून यामागील कारणांचा शोध घेतला जावा, या डॉक्टरांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम व असंवेदनशील, आदिवासी लोकसंख्याबहुल भागात जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांकडून रुग्णाच्या जिवाचे बरेवाईट होण्याचा धोका असल्याने बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.
वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत डॉक्टरच प्रत्यक्ष सेवा देऊ शकतो, मात्र परिसरात सर्रासपणे परवानाधारक डॉक्टरच्या नावाखाली हे बोगस डॉक्टर ज्या कामात अधिकृतता देखील नाही असे वैद्यकीय काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी थाटलेल्या दवाखान्यात त्यांचे खास केबिन आहे.
इगतपुरी तालुक्यात ३२ अधिकृत व १३ बोगस डॉक्टर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या माहितीवरून समोर आले आहे. तालुक्यात ओपीडी व हॉस्पिटल संख्या दोनशेहून अधिक कशी? बोगस डॉक्टर सर्वेक्षण समितीकडून वेळेत बैठका अथवा त्याची माहिती जनतेपर्यंत येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. प्रिस्क्रिप्शनवर नाव नंबर नसलेले अनेक डॉक्टरांची माहिती स्थानिक मेडिकल व्यावसायिकांना असते, पण त्यांचीही मदत घेतली जात नाही.
या उपाययोजना शक्य
- क्षेत्रीय विभागात अधिकृत डॉक्टरांची यादी ठळकपणे लावावी.
- डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन क्युआर कोड वापरणे बंधनकारक असावे.
- बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा तपशील जाहीर करावा.
- जि.प. सीईओंनी याचा दर आठवड्याला आढावा घ्यावा.
बिनधास्तपणे व्यवसाय सुरू
या बोगस डॉक्टरांकडून रुग्णाला आजार बळावल्यावर शहरातील लागेबांधे असलेल्या अधिकृत रुग्णालयाकडे पाठवून पद्धतशीरपणे आर्थिक लूट केली जाते. गुन्हे दाखल झालेले बोगस डॉक्टर जामिनावर बाहेर येताच पुन्हा व्यवसाय सुरु करतात.
आदिवासी भागातून चांगली माया जमाविल्यावर हेच बोगस डॉक्टर घोटी अथवा महामार्गाच्या आजूबाजूला नाशिक किंवा अधिकृत डॉक्टरांच्या नावाचा फलक लावून राजरोसपणे व्यवसाय चालवतात. किरकोळ आजार असला तरी सर्व प्रकारच्या चाचण्या बंधनकारक ठरलेल्याच, काही ठिकाणी फिरते तर काही परिसरात ओपीडी टाकून व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु आहे.
लोकप्रतिनिधीही थंडच
आयुर्वेदिक पदव्या घेत अलोपॅथिक औषधे वापरले जाऊनही अधिकृत डॉक्टरांच्या नावाखाली रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थांबविणे सहज शक्य आहे.मात्र समितीचेच या डॉक्टरांशी लागेबांधे आहेत की काय याची शंका यावी अशी स्थिती आहे.
फिर्यादीवर दबावतंत्राचा वापर करून प्रकरण दडपली जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही याकडे गांभिर्याने पाहायला तयार नाहीत. नोटीस फलकावर अधिकृत व्यावसायिकांची क्युआर कोडसह माहिती देण्यात यावी. तत्सम जबाबदार विभाग व कारभाऱ्यांना याची कल्पना नसणे हास्यास्पदच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.