विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : जिल्ह्यात बाजार समिती निवडणूकीचा (Market Committee Election) धुराळा उडाला असल्याने राजकारण चर्चेत आले आहे. पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव, नाशिक बाजार समितीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
आजी-माजी आमदारांनी दंड थोपटल्यामुळे ही निवडणूक जरी बाजार समितीची असली, तरी ट्रेलर मात्र विधानसभा निवडणुकीचा दिसत आहे. (market committee election possibility of current and ex MLAs will face each other through panel nashik news)
प्रत्येक बाजार समितीत पॅनलच्या माध्यमातून आजी-माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आजी-माजी आमदार विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत आहेत. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंकडून जय्यत तयारी सुरू आहे.
पिंपळगावला रंगत
आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत या समितीचे नाव आहे. विळ्या भोपळ्याचे नाते असलेले आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खरेतर २०१५ची निवडणूक या दोन्ही नेत्यांनी सामंजस्याने बिनविरोध केली. मात्र, त्यामुळे दोघांनाही कार्यकर्त्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले होते.
विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर त्यावेळी अनिल कदम आमदार होते, आता दिलीप बनकर आमदार आहेत. त्यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध असले, तरी आता मात्र दोघेही महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
येवला-लासलगावही चर्चेत
येवला आणि लासलगाव बाजार समितीत यंदा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष घातले आहे. येवला बाजार समितीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा पॅनल उतरविण्याची तयारी केली आहे. मात्र, पॅनलमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, संभाजी पवार यांनी सन्मानपूर्वक जागा मिळाल्याशिवाय न जाण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे भुजबळ विरूद्ध दराडे असा सामना आतापासूनच दिसू लागला आहे. तर लासलगावला मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांचा पॅनल असून, त्यास भुजबळ ताकद देणार असल्याची चर्चा आहे. त्या विरोधात माजी सभापती पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र डोखळे यांचा पॅनल असेल. त्यामुळे येथे भुजबळ विरूद्ध राष्ट्रवादीचे थोरे, भाजपचे डी. के. जगताप अशी लढत होणार आहे.
नांदगाव, मालेगाव, सिन्नरलाही चुरस
नांदगाव बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा पॅनल उतरविला असून, त्या विरोधात माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारी केली आहे.
सिन्नर बाजार समितीत आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांचा पॅनल उतरत असून, त्यांना टक्कर देण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे पॅनल करत आहेत. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्येच ही लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.
कोण मारणार बाजी?
नाशिक बाजार समितीत माजी खासदार देविदास पिंगळे यांना शह देण्यासाठी पहिल्यादाच खासदार हेमंत गोडसे यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे येथे आजी-माजी खासदारांमध्ये सामना होण्याची चिन्हे आहेत. दिंडोरी बाजार समितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनलची मुठ बांधली जाण्याची शक्यता आहे. त्या विरोधात माजी आमदार धनराज महाले भाजपला सोबत घेऊन पॅनल देण्याच्या तयारीत आहेत.
चांदवड बाजार समितीत सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे पॅनल उतरवित आहेत. यात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्याविरोधात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दंड थोपटले आहेत. एकुणच आजी-माजी आमदारांनी निवडणूक आखाड्यात दंड थोपटले असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.