समाजात वावरताना आयुष्यातील चढ-उतार पार केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही, या सकारात्मक विचारांची पाठराखण करत तिचं जगणं सुंदर करत होती. मात्र नियतीनं ऐन उमेदीच्या वयात कुंकू हिरावून नेल्यानं दोन चिमुरड्यांसह तिच्या नशिबी आलेलं दुःख खूप मोठं होतं. आयुष्यात आलेल्या या संकटात खचून न जाता त्या उभ्या राहिल्या. खानदेशातील अक्कलकुवा येथील माहेरवाशीण आणि घोटी शहरात स्वतःच्या कर्तृत्वाने संकटांना परतवून लावत माया टेलर ही ओळख उभी करतानाच भव्य शोरूमच्या मालकीण बनल्यात त्या मायाताई तिवर..! (Mayatai tivar inspirational story from Tailor to cosmetics showroom owner nashik news)
खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हे माहेर. माया उमेश तिवर यांचे शिक्षण जेमतेम दहावी. वडील रतनलाल केदाजी चव्हाण यांचे पत्नी कमलाबाई, पाच बहिणी व तीन भाऊ असे मोठं खटल्याचं कुटुंब... मात्र चव्हाण कुटुंबात आलेल्या आकस्मिक संकटानं मायाताई यांचं शिक्षण अर्ध्यावरच सुटलं... रतनलाल चव्हाण अक्कलकुवा शहरात किराणा दुकान चालवायचे. याशिवाय मोहाची फुले खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता.
मात्र सर्व काही सुरळीत असलेल्या व्यापारी कुटुंबावर मोठं संकट कोसळले आणि चव्हाण कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. आजारांपासून चार हात दूर असलेल्या कुटुंबात रतनलाल चव्हाण यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले. मात्र सकारात्मक विचार आणि कुटुंबाने दिलेल्या आधाराने या आजारावर मात करत ते नव्या उमेदीने उभे राहिले. मात्र यातून काही वर्षांतच ते कुटुंबाला सोडून निघून गेले. या काळात कुटुंबावर आलेल्या वादळाने कुटुंब कोलमडून पडले. त्या वेळी मायाताई अवघ्या चौथीच्या वर्गात होत्या.
शिक्षण अर्ध्यावरच राहिले. याच काळात मायाताई आणि कुटुंबातील भावंडं पुन्हा व्यवसायाची घडी बसवत होते. कुटुंबातील जबाबदाऱ्या कमी करत मायाताई यांचा विवाह २००२ मध्ये इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील उमेश तिवर यांच्याशी झाला. उमेश यांचेही शिक्षण जेमतेम. टेलरिंग व्यवसाय करत तिवर कुटुंब उदरनिर्वाहाचे साधन भक्कम करत होते.
कुटुंबासाठी बनल्या आधार
तिवर कुटुंबात उमेश तिवर यांचे टेलरिंग व्यवसायात इगतपुरी तालुक्यात नाव होते. याच व्यवसायात मायाताई यांनीही उमेश यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या मनमिळाऊ स्वभाव, तत्पर सेवा आणि जनसंपर्काच्या जोरावर माया टेलर म्हणून त्यांनीही स्वतःची ओळख उभी केली. आयुष्यातील वाटचाल पुढे नेत असतानाच याच काळात प्रिन्स व कृष्णा या मुलांच्या निमित्ताने तिवर कुटुंबातील सदस्यसंख्या वाढली. तिवर कुटुंबाला पुढे नेत मायाताई यांच्यानिमित्ताने उमेश यांना मोठा आधार मिळाला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असावं आणि कुटुंब दुःखात लोटलं गेलं.
नियतीनं कुंकू हिरावलं
तिवर कुटुंबाला हातभार लावताना दोघांच्या भविष्यातील नियोजनाला नियतीनं ग्रहण लावलं आणि २०१६ मध्ये मायाताई यांचं कुंकू नियतीनं हिरावल्यानं कुटुंबावर मोठा आघात केला. पतीच्या अकाली निधनानं मायाताई, तिवर परिवार, तसेच दोन्ही चिमुकल्यांसाठी हा मोठा धक्काच होता. या काळात समोर अंधार दिसत असतानाच मायाताई यांच्या राजस्थान येथील मैत्रीण, तसेच सामाजिक कार्यकर्त्या, तनिष्का सदस्या पूनम राखेचा यांनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत पुन्हा उभे करण्यासाठी मानसिक बळ दिले. यातूनच मायाताई यांनी तिवर कुटुंबासाठी आई-वडिलांची भूमिका बजावत नियतीलाच आव्हान देत नव्याने वाटचाल सुरू केली.
माया टेलर ते शोरूमची मालकीण
पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सूत्रे हाती घेतानाच मुलांच्याही शिक्षणाकडे लक्ष पुरवले. टेलरिंग व्यवसायाला जोड देत असतानाच घोटी शहरातील महिलांची गरज लक्षात घेऊन व्यवसायात बदल केला. सर्व वस्तू एकाच छताखाली आणण्यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेल्या ७० हजारांचे भांडवलाच्या जोरावर आज स्वमालकिचे भव्यदिव्य कॉस्मेटिक्सचे कृष्णा इमिटेशन या नावाने शोरूम घोटी शहरात सुरू केले आहे. गारमेंटसह अन्यही वस्तू विक्री सेंटरच्या माध्यमातून घोटीमधील नऊ कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
प्रगतीचा वाढता आलेख आणि महिलांसाठी प्रेरणास्थान
अक्कलकुवा येथे माहेरी असतानाच वडिलांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर झालेल्या आघातामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेल्या मायाताई यांनी आज घोटी शहरात माया टेलर या नावाने उद्योजिका म्हणून उभी केलेली ओळख नक्कीच अभिमानास्पद आहे. पतीच्या अकाली जाण्याने पुन्हा उभारी घेताना पूनम राखेचा, संदीप किरवे, शरद चौधरी, गटप्रमुख वैशाली गोसावी यांनी दिलेलं बळही मोलाचं असल्याचं त्या अभिमानाने सांगतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.