नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता.१५) पक्षाच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परंतु, एकजूट दाखविण्याचा हा प्रयत्न कागदावरच राहतो की प्रत्यक्षात उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत नाशिक दौऱ्यावर येत आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, योगेश लभडे, महिला सेनेच्या कामिनी दोंदे, अर्चना जाधव, सुजाता डेरे आदी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. गेल्या साडेचार वर्षात संघटनेकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या या पावित्र्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पक्षाअंतंर्गत मोठ्या प्रमाणात वाद असल्याने ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांना थेट संपर्क साधण्यासाठी खासगी भ्रमणध्वनी उपलब्ध करून दिला. यावरून वरिष्ठांकडून कनिष्ठांची होणारी अडवणूक थांबविण्यात आल्याचे स्पष्ट होते. पक्षांतर्गत वादाची खदखद बाहेर येत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर ही बाब परवडणारी नसल्याची बाब समोर येत असल्याने दौऱ्याची माहिती देण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली.
दौऱ्यावर चर्चा
बैठकीत २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज ठाकरे, युवानेते अमित ठाकरे यांचा दौरा, नवीन शाखाध्यक्षांच्या नेमणुका, शाखाध्यक्षांचा मेळावा, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी यावर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. आभार भाऊसाहेब निमसे यांनी मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.