नाशिक : शेतात राबून धान्यासाठी कष्ट उपसणाऱ्या बैल व शेतकऱ्यांचे नाते वृद्धिंगत करणारा सण म्हणून पोळ्याची ओळख आहे. शेतीचे क्षेत्र घटल्याने पशुधनावरही मोठ्या प्रमाणावर संक्रांत आली आहे.
मात्र, या परिस्थितीतही उद्याच्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील बाजार समितीच्या परिसरात बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची गुरुवारी (ता. २५) लाखो रुपयांची खरेदी करण्यात आली. (Millions of rupees turnover on festival Bail Pola 2022 nashik latest marathi news)
कधीकाळी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबात मोठ्या प्रमाणावर पशुधन होते. कालौघात एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होऊन विभक्त कुटुंब पद्धती आली. त्यामुळे शेतीसह घराचेही वाटे झाले. शेतीचे क्षेत्रच कमी झाल्याने त्यातच ट्रॅक्टरसह अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने सहाजिकच दोन, दोन बैलजोड्या ठेवणे जिकिरीचे होऊ लागले.
त्यातच शेतीचे तुकडे झाल्याने चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधन वीस पंचवीस टक्क्यांवर आले आहे, मात्र याही परिस्थितीत बळीराजाचे लाडक्या सर्जाराजावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. त्याची प्रचिती बाजारातील खरेदीतील उत्साहावर दिसून आली. गतवर्षीपेक्षा यंदा बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याचे बाजार समितीजवळील विक्रेत्यांनी सांगितले.
दिंडोरी रोडवरील बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणावर ही दुकाने सजली असून, प्रतिकूल परिस्थितीतही या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बैलाला सजविण्यासाठी विविध वस्तूंसह वेगवेगळे रंगही बाजारात दाखल झाले आहेत.
क्रम वस्तू दर
१. मातोडी २०० पासून ५०० रुपयांपर्यंत
२. मोरकी १८० ते ५०० रुपये
३. वेसण १२० रुपये जोडी
४. कासरा १५० रुपयांपासून
५. गोंडे १०० रूपयांत जोडी
"मागील दहा वर्षांपासून मातीच्या बैलांसह पोळ्यासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याची विक्री करते. या वर्षी वीस रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत पीओपीपासून बनविलेल्या बैलजोड्या उपलब्ध आहेत. "- सुनीता उपाध्ये, विक्रेता.
"शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने आपसूकच पशुधनाची गरज कमी झाली. त्यातच ट्रॅक्टरसह अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील पशुधन वीस पंचवीस टक्क्यांवर आले आहे. " - लहानू भोये, शेतकरी, रवळगाव (आळंदी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.