अभोणा (जि. नाशिक) : हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने इतर ऋतूंपेक्षा सर्वच घटकांसाठी अत्यंत उपयुक्त असतो. याकाळात लहानथोर मंडळी शारीरिक व्यायामासाठी घराबाहेर पडतात. शारीरिक व्यायाम व निसर्ग पर्यटनासाठी मोहनदरी (ता. कळवण) येथील डोंगरावर असलेली ‘नेढ’ (डोंगर सुळक्याला पडलेले खिंडार) पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. (Mohandari Nedha attracting tourists paradise for nature lovers Nashik Latest Marathi News)
नाशिक जिल्ह्यातून पूर्वपश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ ‘शिडका’ हा काहीसा अपरिचित किल्ला आहे. अहिवंत गडापासून पाच आणि सप्तशृंग गडापासून अभोणा गावाकडे तेरा किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंच असलेला हा किल्ला. त्यावरील खिडकीसारख्या दिसणाऱ्या ‘नेढ्या’मुळे आपले चटकन लक्ष वेधून घेतो. शिवकाळात या गडाशेजारच्या अहिवंतगडास खूप महत्व होते. मोहनदर किल्ल्याच्या माथ्यावरून हा गड अहिवंतगडाच्या किती जवळ आहे हे पटकन लक्षात येते. त्यामुळे मोहनदर किल्ल्याचे एकूणच या भागातील संरक्षण व्यवस्थेतील महत्व पटकन आपल्या लक्षात येते.
ज्याअर्थी इ. स. १६७० साली छत्रपती शिवरायांनी अहिवंतगड जिंकून घेतला. त्याअर्थी हा गडही त्याच काळात स्वराज्यात दाखल झाला असला पाहिजे, असे बोलले जाते. मोहनदर किल्ल्यावरील ‘नेढ’ प्रस्तारारोहण (गिर्यारोहण) करण्यासाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. प्रस्तर चढून नेढ्यातून पलिकडे जाता येते. ‘नेढ्या’त चढण्याचा थरार, घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला सर्वांनाच आकर्षीत करतो आहे.
‘नेढ्या’बद्दलची दंतकथा
या भागात महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी, दिंडोरी व कळवण परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासूर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडून तो पलिकडे गेला. त्याचा पाठलाग करताना देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे ‘नेढ’ तयार झाले. अजून एका दंतकथेप्रमाणे देवीने दोघा दैत्यांना ठार केल्यावर हा तिसरा राक्षस रेड्याच्या शरीरात राहतो, हे देवीने हेरले व त्या रेड्याचे शरीर उडवून लावले. त्याबरोबर महिषासुर रेड्याच्या शरीरातून एवढया तीव्र गतीने निघाला की त्या उड्डाणामुळे डोंगराला खिंडार पडले. हे खिंडार म्हणजेच मोहनदर किल्ल्याची ‘नेढ’होय.
‘नेढ’ म्हणजे काय?
लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वारा आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडते. त्याला ‘नेढ’ असे म्हटले जाते. दगडांच्या मधला ठिसूळ भाग ज्याप्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो. मोहनदर किल्ल्यावरील ‘नेढ’ ही प्रत्यक्षात खुपच सुंदर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.