नाशिक : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) लॅन्डिंग झालेली विमाने (Aeroplane) मेन्टेनन्स रिपेअर व ओव्हरऑयलिंग (एमआरओ)साठी सिंगापूर अथवा अन्य शहरांमध्ये जातात. यात वेळ व पैसा दोन्ही गोष्टी खर्च होतात. ओझर विमानतळाबरोबरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)चा वापर विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी होणे शक्य आहे. निरंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरेल. त्यामुळे या उपलब्धीचा विचार करून ओझरच्या तयार इन्फ्रास्ट्र्क्चरचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत. (MRO of aeroplane possible due to HAL Nashik News)
प्रवासी व लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्ती हा भाग महत्त्वाचा असतो. ठराविक हवाई अंतर कापल्यानंतर विमानांची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते; परंतु एमआरओसाठी देशातील अन्य विमानतळांवर विमाने जातात. बहुतेक कंपन्या सिंगापूर येथे एमआरओसाठी विमाने रवाना करतात. यात वेळ व पैसा दोन्ही बाबी खर्च होतात. विमान कंपन्यांना वाढत्या इंधन दरामुळे परवडणारे नाही. त्यामुळे ओझर विमानतळावर तयार इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर शक्य आहे. ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी आहे. येथे लढाऊ विमाने तयार केली जातात. या विमानांचे एमआरओ येथे होत असल्याने प्रवासी विमानांचेदेखील एमआरओ करता येणे शक्य आहे. ही बाब विमान कंपन्यांनी लक्षात घेतल्यास वेळ व खर्चाची बचत या दोन्ही गोष्टी सहज साध्य होणाऱ्या आहेत. यातून विमान कंपन्यांचा तोटा भरून निघण्याबरोबरच नाशिकमधून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाणे शक्य आहे. त्याचबरोबर रोजगाराची निर्मितीदेखील होईल.
विमानसेवा सुरळीत झाल्यास देशविदेशातील तज्ज्ञ व्यक्तींना विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सहजरीत्या नाशिकला येता येईल. ऑनलाइन संवादाला मर्यादा येत असल्याने प्रत्यक्ष संवादातून विद्यार्थी तज्ज्ञांकडून खूप काही शिकू शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राष्ट्रीय, जागतिक विद्यापीठ, संस्थांशी सामंजस्य करार केल्यास, अशा वेळी विद्यार्थ्यांना देशात-परदेशात अध्ययनाकरिता विमानसेवेचा मोठा आधार होऊन त्यांना जास्तीत जास्त वेळ शिकायला देता येईल. शैक्षणिक विकासाच्या दृष्टीनेही नाशिकमध्ये विमानसेवा सक्षम होणे महत्त्वाचे आहे.
- नीलिमाताई पवार, सरचिटणीस, मविप्र संस्था
"सैनिकी शिक्षणात लष्करातील मोठ्या अधिकारी, तज्ज्ञांकडून मिळणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. विमानसेवेत सुधारणा झाल्यास राष्ट्रीय स्तरावरील लष्करी अधिकारी, तज्ज्ञांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करता येईल. तसेच विविध सैनिकी इन्स्टिट्यूटच्या अभ्यासदौऱ्यांकरिता विमानसेवा सुविधाजनक ठरू शकेल. डिस्टन्स एज्युकेशनसाठीदेखील विमानसेवा सक्षम होणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारची उडान सेवा आणखी सक्षम करण्याची आवश्यकता आहे."
-सीएमए हेमंत देशपांडे, कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
"एज्युकेशन हब म्हणून नाशिकची ओळख निर्माण झालेली असताना राष्ट्रीय पातळीवरून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी दाखल होतात. अशात विमानसेवेचे जाळे आणखी मजबूत झाले तर देशभरातील हुशार विद्यार्थी नाशिकला शिक्षणासाठी सहजरीत्या येऊ शकतील. तसेच तज्ज्ञ व्यक्तींना विमानाच्या माध्यमातून पाचारण करत विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणता येईल. विमानसेवेचा विस्तार होणे शिक्षण क्षेत्रासाठीदेखील आवश्यक आहे."
-राजाराम पानगव्हाणे-पाटील, संस्थापक, नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ
"केजी ते पीजीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण नाशिकमध्ये उपलब्ध झालेले आहे. शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिकमध्ये विमानसेवेचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. परदेशातील विद्यापीठाशी सामंजस्य करार करत विद्यार्थी आदानप्रदान योजना राबविणे सुलभ होईल. याशिवाय उद्योगविश्वासतील दिग्गज व्यक्तींचा विद्यार्थ्यांशी संवाद घडविणेदेखील शक्य होऊ शकेल." -डॉ. रवींद्र सपकाळ, अध्यक्ष, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट
पुण्याच्या लोकसंख्येपैकी सुमारे २० टक्के विद्यार्थी असून, ते देशविदेशातून शिक्षणासाठी दाखल झालेले आहेत; परंतु आता विस्ताराबाबत पुण्यात मर्यादित संधी आहेत. त्या तुलनेत एज्युकेशन हब होण्याची क्षमता नाशिकमध्ये असून, यातूनच खासगी शिक्षण संस्था, विद्यापीठांचा येथे विस्तार होतो आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची उपलब्धता व शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विमानसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नाशिक देशातील अन्य शहरांशी जोडले गेले असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानसेवादेखील सुरू होणे महत्त्वाचे असेल.
-हेमंत धात्रक, सरचिटणीस, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.