नगरसूल (जि. नाशिक) : शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, असे सर्व राजकारणी निवडणुकीवेळी बेंबीच्या देठापासून ओरडत असतात. मात्र नंतर शेतकऱ्याचा साऱ्यांनाच विसर पडतो. कांद्याला जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा, ही मागणीही तशीच अधांतरी राहिलेली.
त्यामुळे कांद्याचे पीक म्हणजे एक जुगार ठरला आहे. निवडकवेळी थोडेच दिवस बरे राहिलेले दर नंतर असे काही पाडले जातात, की नको ते कांदा पीक, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कांद्याच्या दरातील घसरणीने शेतकरी कमालीचा खचला आहे. उत्पादनखर्चही निघत नसल्याने हताश झालेल्या येथील एका शेतकऱ्याने थेट कांद्याला अग्निडागचा कार्यक्रम घोषित करून संताप व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाची पत्रिकाही त्याने छापली असून, स्वतःच्या रक्ताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आपल्याला काही देणेघेणे नाही का, असा प्रश्न उपस्थित करीत समस्त कांदा उत्पादकांचे दुःख व्यक्त केले आहे. (Nagarsul farmer sent invitation letter written in blood to CM eknath shinde about burning onion crop on holi festival nashik news)
नगरसूल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याच्या कोसळलेल्या दराबाबत शासनाविरोधात नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त करण्यासाठी दीड एकर कांदा पीक जाळण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी डोंगरे यांनी ५ मार्च, होळीच्या दिवशी आपल्या शेतावर कांदा अग्निडाग करण्यात येणार असल्याचे जाहीर करून पत्रिका छापल्या आहेत. या पत्रिकेत चि. कांदा- (सर्वच शेतकऱ्यांचा लाडका व शेतकऱ्यांना खड्यात गाडून टाकणारा) तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य-कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव छापण्यात आले आहे.
प्रेषक म्हणून महाराष्ट्रातील मीडिया, संयोजक महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी, अशी निमंत्रणपत्रिकेत रचना केली आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
ही निमंत्रणपत्रिका शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह सर्वच आमदार, खासदार, राजकीय नेत्यांना पाठविली आहे.
त्या सोबतच स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कांदा जाळण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांदा पीक जळण्यासाठी तयार केलेली पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला आहे.
"वीज, सिंचन, हमीभाव, आरोग्य, शिक्षण, मुला-मुलींचे लग्न असे अनेक यक्ष प्रश्न भेडसावत असतानाच आज कांदा शेतकऱ्यांना रडवतोय. गेंड्याची कातडी परिधान केलेल्या सरकारचे लक्ष वेधून निषेध व्यक्त करण्यासाठी मी कांदा जाळण्याचा जाहीर कार्यक्रम आखला आहे."
- कृष्णा डोंगरे, शेतकरी नगरसूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.