नाशिकच्या दोघांचा वनसेवा परीक्षेत डंका...!

nakul.jpg
nakul.jpg
Updated on

नाशिक/येवला : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवारांनी घवघवीत यश मिळविले. यात मूळचा सिन्नर येथील रहिवासी व सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेला नकुल राजेंद्र देशमुख याने देशात 53 वा, तर राज्यात पाचवा, तर कोटमगाव (विठ्ठलाचे) (ता. येवला) येथील गौरव रवींद्र वाघ याने देशात 88 वा, तर राज्यात नववा क्रमांक पटकावला आहे. 

जिद्द न हरता नकुलची ध्येयाला गवसणी

सिन्नर येथील नकुलचे वडील इगतपुरी येथे वन विभागातच लेखापाल आहेत. त्याचे चौथीपर्यंतचे शिक्षण नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेत झाले. त्यानंतर त्याने महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पाचवीला प्रवेश घेतला. तेथील शिक्षक रामानंद बर्वे यांनी त्याला शिष्यवृत्ती अभ्यासक्रम शिकविला. पुढे नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातून घेतले. त्यानंतर पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी.ई. मेकॅनिकल ही पदवी संपादन केली. त्यानंतर सनदी अधिकारी परीक्षेची तयारी करण्यासाठी नकुलने दिल्लीत क्‍लासमध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या वर्षी त्याने सनदी अधिकारी परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, तेथे त्याला अपयश आले; परंतु जिद्द न हरता त्याने सनदी अधिकारीपदाच्या परीक्षेसोबतच आयएफएस परीक्षासुद्धा दिली. या काळात दोन्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याने आयएफएस परीक्षेच्या मुलाखतीत यश मिळविले. या परीक्षेत तो देशात 53 वा, तर राज्यात पाचवा आला. दरम्यान, येत्या 23 मार्चला त्याची सनदी अधिकारीपदासाठीही मुलाखत होणार आहे.

दुसऱ्याच प्रयत्नात मिळविले गौरवने यश
 
दुसरीकडे शालेय जीवनातच आई-वडिलांचे छत्र हरपले असूनही जिद्द, मेहनत आणि यशाची पताका फडकविण्याच्या ऊर्मीतून कोटमगाव (विठ्ठलाचे) येथील गौरव वाघ यानेही या परीक्षेत यशाची पताका रोवली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर गौरव व त्याच्या भावाचा आईकडचे आजी-आजोबा मंगला व बाळासाहेब काकळीज (नाशिक) यांनी सांभाळ केला. गौरवचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयातून दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत चमकला होता. पुढे त्याने पुणे येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा चंग बांधून तो दोन वर्षांपासून दिल्लीत तयारी करत होता. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. 

लाखात दोघेच..! 

या परीक्षेसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी बसले होते. त्यातील मुख्य परीक्षेला दहा हजार विद्यार्थी निवडले गेले. मात्र, त्यापैकी केवळ 224 विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यांपैकी फक्त 88 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली असून, या सर्वांमध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थ्यांचा अन्‌ त्यातही नाशिक जिल्ह्यातील नकुल आणि गौरव या दोघांचाच समावेश आहे. 

हेही वाचा > दुष्काळी मातीतील द्राक्षांचा गोडवा परदेशात!...'या' तालुक्‍यातून तीन हजार टन द्राक्षांची निर्यात...
 
सुरवातीपासूनच मनाची तयारी करून, मी पदवीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा ध्यास घेतला. एक-दोनदा यूपीएससीच्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत पोचलो. दरम्यानच्या काळात इंडियन आर्मी पोलिस फोर्सेसमध्येही उत्तीर्ण झालो; पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून होतो. आज उत्तीर्णांच्या यादीत नाव आल्याने मनस्वी आनंद झाला आहे. - गौरव वाघ, कोटमगाव विठ्ठलाचे  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.