नाशिक : आईला कंपनीतून काढून टाकल्याच्या रागातून महिलेच्या मुलाने आपल्या साथीदारांसह कंपनीच्या व्यवस्थापकावर भरदिवसा, चॉपर, कोयता आणि तलवारीने हल्ला करत त्याचा खून (Murder) केला. ही घटना मंगळवारी (ता.७) सकाळी दहाला अंबड औद्यागिक वसाहतीमधील सिमेन्स कंपनीजवळ घडली. नंदकुमार आहेर (वय ५०) असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. नंदकुमार आहेर यांच्या हत्येमुळे शहरात अठरा दिवसांमध्ये आठवा खून झाला आहे. त्यामुळे शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. (nandakumar aher murder case filed series of murder in city Nashik Crime News)
अंबड औद्यागिक वसाहतीमध्ये प्रवीण आहेर यांचे आहेर इंजिनिअरिंग वर्क्स नावाची कंपनी आहे. कंपनीमध्ये त्यांचे पुतणे नंदकुमार आहेर हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. याच कंपनीत काम करणाऱ्या महिलेला काही कारणास्तव कामावरून कमी करण्यात आले होते. आईला कंपनीतून कमी केल्याच्या रागातून संबंधित महिलेच्या मुलाने आपल्या तिघा मित्रांसह या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहाला नंदकुमार आहेर हे अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स कंपनीकडून गंगाविहारकडे जात असताना सिमेन्सजवळील आहेर इंजिनिअरिंग कंपनी (एफ १८/२) येथे आले.
गाडीतून खाली उतरल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांच्यावर तलवार व इतर धारदार हत्याराने सपासप वार करत त्यांना जखमी करत घटनास्थळावरून एकाच दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यात नंदकुमार जखमी झाल्याचे दिसताच कंपनीतील सचिन आणि अमोल या कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त दिलीप बारकुंड, अमोल तांबे हे देखील घटनास्थळी आले. त्यानंतर हल्लेखोराच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आजूबाजूला तपासणी केली असता त्यांना हल्ल्यात वापरलेली रक्ताने माखलेली तलवार मिळून आली.
असा मिळाला संशयित
नंदकुमार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर अवघ्या तीन तासात या प्रकरणातील एका संशयिताचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. नंदकुमार यांच्यावर संशयित हे वार करत असताना तिघांपैकी एकाचा वार हा संशयिताच्या मांडीवर लागल्याने त्यांच्या पायातून रक्तस्राव सुरु झाला. यावेळी चौघांनी तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. तिघा संशयितांनी जखमी संशयिताला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यास काय झाले असे विचारले असता पत्रा लागल्याचे त्याच्या साथीदारांनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांना संशयित जखमी झाल्याचे कळताच त्यांनी जवळील सर्व रुग्णालयांमध्ये चौकशी केली. यावेळी एका खासगी रुग्णालयात त्यांना जखमी तरुण दाखल झाल्याचे कळताच त्यांनी रुग्णालयात जात चौकशी केली असता सर्व घटनाक्रम संशयिताने सांगितला. त्यानुसार इतर तिघा संशयितांची देखील नावे पोलिसांना समजली. सर्व मारेकरी हे १८ ते २० वय वयोगटातील आहेत.
शहरात खुनाचे सत्र सुरुच
नंदकुमार आहेर यांच्या खुनामुळे शहरात आठवा खून झाला आहे. मागील अठरा दिवसामध्ये आठ खून झाल्याने खुनाचे सत्र शहरात सुरूच आहे. मागील दोन ते तीन दिवसात शहरातील विविध भागांत तरुणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलिसांकडून रात्रीचा गस्त, कोम्बिंग ऑपरेशन आदी उपाययोजना राबविल्या जात असताना देखील मंगळवारी आहेर यांच्या खुनामुळे पोलिसांच्या ह्या उपाययोजना फोल ठरत असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.