Nashik News : पंढरीच्या वारीच्या रस्त्यावर पेरले 10 हजार सीडबॉल!
येसगाव : वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील मानाचा तुरा व शेकडो वर्षांपासून अखंड चालणारी वैभवशाली परंपरा. यात ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत थकलेल्या पावलांना विसाव्याची गरज असते. त्यासाठी ठिकठिकाणी वृक्षांची गरज भासते. पंढरपूरच्या वारीसाठी नवीन झालेल्या पालखी महामार्गावर अनेक वृक्ष तोडण्यात आले. (10 thousand seedballs planted on Pandhari Wari road)
वारकऱ्यांना सावलीची उणीव भरून काढण्यासाठी येसगाव खुर्दच्या शुभम शेलार या तरुणाने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या तत्त्वाचा ध्यास घेऊन एक संकल्पना रुजवली. अभिषेक बडे व मयूर पावडे यांना सोबत घेत माउलींच्या रथामागच्या दिंडी क्रमांक ५५ सोबत वारीच्या वाटेवर सीडबॉल उगवण्याचा उपक्रम राबविला.
तरुणाईने वृक्षारोपणाचा दहा हजार सीडबॉल (बीजगोळे) पेरून हरित वारीचा वसा रुजविला. सासवड ते वाखारीपर्यंत दिंडीबरोबर अभंग गात संकल्पना राबविली. जेथे बीजगोळ्यांची गरज आहे, तेथे विसाव्याच्या ठिकाणी लागवड केली. काटेरी झाडे-झुडपांच्या बुडाच्या ठिकाणी सीडबॉलची पेरणी केली. कमी पाण्यावर येणारे आंबा, पापडी, निम, सीताफळ, चिंच, गुलमोहर, जांभूळ यांसारख्या बियांचा समावेश आहे.
तरुणांनी दीड महिना आधी सीडबॉल मिळण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा जोतिबा फुले कृषी महाविद्यालयातील (पुणे) राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले पाच हजार सीडबॉल, वन विभाग (फलटण), जय मल्हार लग्न सूचक संस्थेने एक हजार २०० व खुडूस (ता. माळशिरस) वन विभाग परिक्षेत्राकडून चार हजार बीजगोळ्यांची मदत मिळाली. (latest marathi news)
दिंडी- पालखी जेथे थांबत नाही, तेथे झाडांची जास्त गरज आहे, असे सांगण्यात आले. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांना उन्हात सावली मिळावी, तेथे आळंदी ते पंढरपूर वारीत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला. वारीच्या वाटेवर हिरवे स्वप्न पेरण्याची धडपड आणि तळमळ फळास येईल, अशी तरुणांना अपेक्षा आहे.
"गेल्या वर्षी फक्त पाच हजार बियाणे टाकण्याचे लक्ष्य होते. मात्र, यंदा दहा हजार सीडबॉल पेरून रुजविलेल्या वृक्ष वारी नामक वारीला यावर्षी खऱ्या अर्थाने अंकुर फुटला. माउलींच्या कृपेने ठिकठिकाणी बीजगोळे मिळाल्यावर आम्हाला नवीन चेतना मिळाली. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने उपक्रम यशस्वी झाला." - शुभम शेलार, वृक्षवारी संकल्पक, येसगाव खुर्द
"उपक्रम राबविताना दिंडीबरोबर भजन न टाळता सीडबॉलचे ओझे धरणे, ठिकठिकाणी बीजगोळे लावताना थकवा जाणवला नाही. अडचणीतही आनंद मानला. चिखलातून चालणे, पावसात जेवण करणे हे वारीमुळे अनुभवले. माउलींच्या आशीर्वादाने शेकडो बी उगवले तरी वारी सफल होईल." - अभिषेक बडे, वृक्षवारी वारकरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.